एस्प्रेसो, अमेरिकानो आणि मॅकियाटो हे कडक कॉफी आवडणाऱ्यांसाठी चांगले पर्याय आहेत.
कॅपुचिनो, लॅटे आणि मोका यांमध्ये दूध किंवा चॉकलेटचा वापर केल्यामुळे क्रीमी आणि गोडसर चव मिळते.
कोल्ड कॉफी आणि कोल्ड ब्रू हे थंड कॉफीचे लोकप्रिय प्रकार आहेत; मात्र कॅफिन आणि साखरेचे सेवन मर्यादित ठेवा.
सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभराच्या कामातून घेतलेला छोटासा ब्रेक, अनेकांना कॉफी प्यायला आवडते. कॉफीचा सुगंध आणि तिची चव मन प्रसन्न करण्यास मदत करते. आजकाल कॉफी केवळ एक पेय राहिले नसून ती अनेकांच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनली आहे.अनेक व्यक्तींना कॉफी चे नवीन नवीन प्रकार पियायला आवडतात. कॅफेमध्ये गेल्यानंतर एस्प्रेसो, कॅपुचिनो, लॅटे, मोका असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. मात्र, प्रत्येक कॉफीची चव, बनवण्याची पद्धत आणि त्यामध्ये वापरले जाणारे साहित्य वेगवेगळे असते. काही कॉफी कडक असतात, तर काहींची चव गोड आणि सौम्य असते.त्यामुळे ती कॉफी प्रत्येक व्यक्तीला आवडेलच असे नसते. चला तर जाणून घेऊया कॉफीचे आठ लोकप्रिय प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
एस्प्रेसो हा कॉफीचा लोकप्रिय प्रकार आहे. बारीक दळलेल्या कॉफीच्या पावडरमधून जास्त दाबाने गरम पाणी सोडून ही कॉफी तयार केली जाते. ती कमी प्रमाणात दिली जाते. तिची चव कडक आणि गडद असते. इतर अनेक कॉफी तयार करण्यासाठी एस्प्रेसोचा वापर केला जातो.
कॅपुचिनो हा कॉफीप्रेमींच्या आवडीचा प्रकार आहे. यामध्ये एस्प्रेसो, वाफवलेले दूध आणि दुधाचा फेस यांचा वापर केला जातो. या तिन्ही घटकांमुळे कॉफीला मऊसर आणि क्रीमी चव मिळते. वरून कोको पावडर किंवा दालचिनी भुरभुरवून तिची सजावट केली जाते.
ज्यांना सौम्य चवीची कॉफी आवडते त्यांच्यासाठी लॅटे उत्तम पर्याय आहे. एस्प्रेसोमध्ये जास्त प्रमाणात वाफवलेले दूध मिसळून ही कॉफी तयार केली जाते. यावर दुधाच्या फेसाच्या मदतीने सुंदर आर्ट तयार केले जाते. त्यामुळे कॅफेमध्ये लॅटे आर्ट विशेष लोकप्रिय आहे.
चॉकलेट आणि कॉफी या दोन्हींची आवड असणाऱ्यांसाठी मोका हा खास प्रकार आहे. एस्प्रेसो, दूध आणि चॉकलेट सिरप एकत्र करून ही कॉफी तयार केली जाते. काही ठिकाणी त्यावर व्हीप्ड क्रीम आणि चॉकलेट पावडरही घातली जाते. त्यामुळे तिला गोडसर आणि चॉकलेटी चव मिळते.
एस्प्रेसोमध्ये गरम पाणी मिसळून अमेरिकानो तयार केली जाते. या कॉफीची चव ब्लॅक कॉफीसारखी असते. ज्यांना दुधाशिवाय आणि कमी क्रीमी कॉफी प्यायला आवडते त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. कॉफीचा नैसर्गिक स्वाद अनुभवण्यासाठी अनेकजण अमेरिकानोला पसंती देतात.
उन्हाळ्यात थंडगार कॉफी प्यायला अनेकांना आवडते. दूध, कॉफी पावडर, साखर आणि बर्फ एकत्र मिक्सरमध्ये फिरवून कोल्ड कॉफी तयार केली जाते. त्यामध्ये चॉकलेट सिरप, व्हॅनिला किंवा आईस्क्रीम घालून वेगवेगळ्या चवी तयार करता येतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना हा प्रकार आवडतो.
कोल्ड ब्रू तयार करण्यासाठी कॉफी पावडर थंड पाण्यात साधारण १२ ते २४ तास भिजत ठेवली जाते. त्यानंतर हे मिश्रण गाळून त्यामध्ये बर्फ किंवा दूध घालून सर्व्ह केले जाते. या कॉफीची चव तुलनेने सौम्य आणि कमी कडवट असू शकते. थंड कॉफी आवडणाऱ्यांसाठी हा वेगळा पर्याय आहे.
एस्प्रेसोमध्ये थोडासा दुधाचा फेस घालून मॅकियाटो तयार केली जाते. या कॉफीमध्ये दुधाचे प्रमाण कमी असल्यामुळे कॉफीची मूळ चव अधिक जाणवते. कडक कॉफी आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. दिसायला छोटी असली तरी तिची चव ठळक असते.
कॉफीमध्ये कॅफिन असल्यामुळे तिचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. जास्त कॉफी प्यायल्यास झोपेवर परिणाम होणे, अस्वस्थता किंवा हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या जाणवू शकतात. तसेच कॉफीमध्ये जास्त साखर, क्रीम आणि फ्लेवर्ड सिरप घालणे टाळावे. प्रत्येक कॉफीची चव वेगळी असल्यामुळे आपल्या आवडीनुसार योग्य प्रकार निवडा आणि कॉफीचा आनंद घ्या.