अॅव्होकॅडो टोस्ट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते?
अॅव्होकॅडो टोस्ट बनवण्याची कृती समजून घेऊया.
अॅव्होकॅडो खाण्याचे आरोग्यदायी कोणते फायदे आहेत?
भारतात अलीकडेच प्रसिद्ध झालेले फळ म्हणजे अॅव्होकॅडो हे सोशल मीडिया वर सर्वत्र प्रसिद्ध होताना दिसतंय. पण सुंदर दिसण्याबरोबरच ते छान देखील लागते.अॅव्होकॅडो टोस्ट हे एकदा तरी घरी करूनबघण्यासारखी रेसिपी आहे. त्यासाठी घरी उपलब्ध असलेल्या भाज्यांचा वापर करून अव्होकॅडो टोस्ट कसे बनवतात ते पाहूया. आजकाल आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करत आहेत. त्यापैकी अॅव्होकॅडो (Avocado) हे एक लोकप्रिय फळ आहे. अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांमध्ये या फळाला विशेष पसंती मिळत आहे. अॅव्होकॅडोपासून तयार केला जाणारा टोस्ट हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
अॅव्होकॅडो टोस्ट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते?
अॅव्होकॅडो टोस्ट तयार करण्यासाठी एक पिकलेला अॅव्होकॅडो, दोन ब्रेड स्लाइस, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर,हिरवी शिमला मिरची,टोमॅटो , चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी. आवडीनुसार चीजचाही वापर करू शकता.
अॅव्होकॅडो टोस्ट बनवण्याची कृती समजून घेऊया.
सर्वप्रथम अॅव्होकॅडोचे दोन भाग करून त्यातील बी काढून घ्या. चमच्याच्या मदतीने त्याचा गर एका भांड्यात काढा. त्यामध्ये काळी मिरी घालून व्यवस्थित मॅश करा. आता ब्रेड स्लाइस तव्यावर किंवा टोस्टरमध्ये कुरकुरीत भाजून घ्या. भाजलेल्या ब्रेडवर तयार केलेली अॅव्होकॅडोची पेस्ट पसरवा. त्यावर चिली फ्लेक्स, कोथिंबीर चिरलेले टोमॅटो आणि शिमला मिरची घाला.त्यावर तुम्ही किसलेले चीज देखील घालू शकता. अशा प्रकारे तुमचा पौष्टिक आणि चविष्ट अॅव्होकॅडो टोस्ट तयार होईल.
अॅव्होकॅडो खाण्याचे आरोग्यदायी कोणते फायदे आहेत?
१. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : अॅव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. हे हेल्दी फॅट्स संतुलित आहाराचा भाग म्हणून हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
२. पचनक्रिया सुधारण्यास मदत :अॅव्होकॅडोमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
३. त्वचेसाठी फायदेशीर :अॅव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
४. वजन नियंत्रणासाठी उपयुक्त : अॅव्होकॅडोमधील फायबर आणि हेल्दी फॅट्समुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
५. रक्तदाब नियंत्रणासाठी मदत : अॅव्होकॅडोमध्ये पोटॅशियम असते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे संतुलन राखण्यास आणि सामान्य रक्तदाब टिकवून ठेवण्यास मदत करते.
६. डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर : अॅव्होकॅडोमध्ये ल्युटीन आणि झेक्सँथिन यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
अशा प्रकारे अॅव्होकॅडोचा आहारात मर्यादित प्रमाणात समावेश केल्यास शरीराला अनेक पोषक घटक मिळू शकतात. मात्र, अॅव्होकॅडोमध्ये कॅलरीचे प्रमाणही जास्त असल्याने त्याचे सेवन योग्य प्रमाणात करावे.