भारतात स्पिती व्हॅली, झिरो व्हॅली, लोकटक सरोवर आणि माजुली बेट यांसारखी निसर्गसौंदर्याने नटलेली अनोखी पर्यटनस्थळे आहेत.
मेघालयातील लिव्हिंग रूट ब्रिज आणि डावकी नदी, तसेच आंध्र प्रदेशातील गंडिकोटा ही ठिकाणे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक रचनेसाठी प्रसिद्ध आहेत.
गुजरातमधील कच्छचे रण पांढऱ्याशुभ्र मिठाचे मैदान आणि रण उत्सवासाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
परदेशात फिरण्याचे अनेकांना आकर्षण असते; मात्र भारतातही अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत, जी आपल्या अनोख्या सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.काही ठिकाणे अशी आहेत जी भारतात असून देखील भारताबाहेर फिरायला आलोय असे वाटते. कुठे बर्फाच्छादित पर्वतरांगा, कुठे पारदर्शक पाण्याच्या नद्या, तर कुठे निसर्गाने तयार केलेले पूल आणि पांढऱ्याशुभ्र मिठाचे वाळवंट पाहायला मिळते. भारतातील ही ठिकाणे केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर स्थानिक संस्कृती, इतिहास आणि निसर्ग जवळून अनुभवण्यासाठीही खास आहेत. जाणून घेऊया भारतातील अविस्मरणीय ठिकणांची माहिती.
हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅली हे निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. समुद्रसपाटीपासून साधारण १२ हजार फूट उंचीवर असलेला हा थंड वाळवंटी प्रदेश 'मिडल लँड' म्हणूनही ओळखला जातो. येथील उंच पर्वतरांगा, विस्तीर्ण दऱ्या, बर्फाच्छादित शिखरे आणि निळेशार आकाश पर्यटकांना भुरळ घालतात. स्पितीमधील की मठ हा सर्वात प्रसिद्ध बौद्ध मठ असून त्याची वास्तुकला पाहण्यासारखी आहे.येथे ट्रेकिंग, कॅम्पिंग, बाइकिंग आणि रात्रीच्या वेळी तारांगण पाहण्याचा आनंद घेता येतो. जून ते सप्टेंबर हा काळ अनेक पर्यटकांसाठी सोयीचा असतो.
अरुणाचल प्रदेशातील झिरो व्हॅली ही हिरव्यागार भातशेती, डोंगररांगा आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या दरीमध्ये अपातानी आदिवासी समुदायाची अनोखी संस्कृती अनुभवता येते. या समुदायाची पारंपरिक भातशेती आणि मत्स्यपालनाची पद्धत विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील बांबूची घरे, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि पारंपरिक जीवनशैली पर्यटकांना आकर्षित करतात. झिरो म्युझिक फेस्टिव्हल हे येथील आणखी एक महत्त्वाचे आकर्षण आहे.
मणिपूरमधील लोकटक सरोवर हे ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती आणि मातीच्या थरांना 'फुमदी' म्हणतात. या फुमदींमुळे सरोवराला अनोखे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे. या उद्यानात मणिपूरचा राज्यप्राणी असलेल्या दुर्मिळ संगाई हरणाचे वास्तव्य आहे.
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात वसलेले माजुली बेट हे जगातील सर्वात मोठ्या नदीबेटांपैकी एक आहे. निसर्गसौंदर्याबरोबरच समृद्ध सांस्कृतिक वारसा हे या बेटाचे वैशिष्ट्य आहे. येथे पारंपरिक सत्र म्हणजेच वैष्णव धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रे पाहायला मिळतात. समगुरी सत्र येथील पारंपरिक मुखवटे तयार करण्याची कला विशेष प्रसिद्ध आहे. हे मुखवटे धार्मिक नाट्यप्रयोगांमध्ये वापरले जातात. याशिवाय बांबूची घरे, स्थानिक हस्तकला, आसामी खाद्यपदार्थ आणि नदीकाठचे सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.
मेघालयातील लिव्हिंग रूट ब्रिज हे निसर्ग आणि मानवी कौशल्याचा अद्भुत नमुना मानले जातात. हे पूल सिमेंट, लोखंड किंवा लाकडापासून तयार केलेले नसून झाडांच्या जिवंत मुळांपासून बनवले जातात. रबर अंजीराच्या झाडांची मुळे बांबूच्या साहाय्याने विशिष्ट दिशेने वाढवली जातात. अनेक वर्षांच्या प्रक्रियेनंतर ही मुळे मजबूत होऊन नैसर्गिक पूल तयार होतात. चेरापुंजीजवळील नोंग्रियाट गावातील डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज हे सर्वाधिक प्रसिद्ध आकर्षण आहे. दोन स्तरांमध्ये तयार झालेला हा पूल पाहण्यासाठी पर्यटकांना जंगलातून आणि अनेक पायऱ्यांवरून प्रवास करावा लागतो.
मेघालयातील डावकी हे पारदर्शक पाण्याच्या उमंगोट नदीसाठी प्रसिद्ध आहे. या नदीचे पाणी इतके स्वच्छ असते की त्यामधील दगड आणि नदीचा तळ स्पष्ट दिसतो. नदीतील बोटी पाण्यावर तरंगण्याऐवजी हवेत लटकल्या आहेत, असा भास निर्माण होतो. हे दृश्य पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. येथे बोटिंग, फोटोग्राफी आणि नदीकिनारी निवांत वेळ घालवता येतो. आजूबाजूचे हिरवेगार डोंगर आणि स्वच्छ वातावरण मन प्रसन्न करतात. डावकीजवळ भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमाही आहे. त्यामुळे सीमावर्ती परिसराचे दृश्य पाहण्याची संधी मिळते.
आंध्र प्रदेशातील गंडिकोटा हे निसर्ग आणि इतिहासाचा सुंदर संगम असलेले पर्यटनस्थळ आहे. पेनना नदीने तयार केलेली खोल दरी आणि तिच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले लालसर खडक यामुळे या ठिकाणाला 'भारताचे ग्रँड कॅन्यन' असे म्हटले जाते. येथील विशाल दरी, नैसर्गिक खडकांची रचना आणि नदीचे वळण पर्यटकांना आकर्षित करतात. गंडिकोटा किल्ला हे या परिसरातील प्रमुख ऐतिहासिक आकर्षण आहे. किल्ल्यामध्ये प्राचीन मंदिरे, मशीद, राजवाड्यांचे अवशेष आणि भव्य प्रवेशद्वारे पाहायला मिळतात.
गुजरातमधील कच्छचे रण हे पांढऱ्याशुभ्र मिठाच्या वाळवंटासाठी प्रसिद्ध आहे. दूरवर पसरलेले पांढरे मिठाचे मैदान आणि त्यावर पडणारा चंद्रप्रकाश हे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. पावसाळ्यानंतर पाणी कमी झाल्यावर येथे मिठाचा पांढरा थर तयार होतो. विशेषतः पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात चमकणारे रण पाहणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. येथील रण उत्सवात गुजराती लोकनृत्य, लोकसंगीत, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि हस्तकलेचा आनंद घेता येतो. पर्यटकांसाठी तंबूंमध्ये राहण्याची व्यवस्थाही केली जाते.