Sambhajinagar Industrial News फोटो सौजन्य AI  Sambhajinagar Industrial News फोटो सौजन्य AI
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Industrial News : औद्योगिक स्मार्ट सिटींच्या यादीत ऑरिकचा दबदबा; ३४० भूखंडांचे वाटप, हजारो रोजगारांची संधी

छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक औद्योगिक क्षेत्राने राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. ऑरिकमध्ये ३,४६२ एकर जमीन उद्योगांना वितरित करण्यात आली असून, ९२,६४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आणि ६५,६६२ रोजगारनिर्मितीची क्षमता नोंदविण्यात आली.

sanman jadhav
  • मूलभूत सुविधांच्या उभारणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

  • शेंद्रा- बिडकिनमध्ये एकरी १.६२ कोटीचा दर

  • उद्योगांसाठी राहणार टेस्टिंग लॅबची सुविधा

Sambhajinagar Industrial News : छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला आता राष्ट्रीय स्तरावरही नवी ओळख मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक औद्योगिक क्षेत्राने देशातील विकसित औद्योगिक स्मार्ट सिटींच्या यादीत ठळक स्थान मिळवले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत (एनआयसीडीसी) विकसित करण्यात आलेल्या चार औद्योगिक स्मार्ट सिटींच्या आढाव्यात ऑरिकमधील ३ हजार ४६२ एकर जमीन उद्योगांसाठी वितरित करण्यात आली आहे.

येथे ३४० भूखंडांचे वाटप झाले असून, तब्बल ९२ हजार ६४० कोटी रुपयांची गुंतवणूक क्षमता आणि ६५ हजार ६६२ रोजगारनिर्मितीची क्षमता नोंदविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जानेवारी ते जून २०२६ या कालावधीतील 'एनआयसीडीसी कनेक्ट या न्यूजलेटरमधून ही माहिती समोर आली आहे.

मूलभूत सुविधांच्या उभारणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

शेंद्रे-बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा विकास हा ऑरिक प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा आहे. न्यूजलेटरमधील माहितीनुसार, शेंद्रा येथील २ हजार ७३ एकर क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे २०१९ मध्ये, तर बिडकीनच्या पहिल्या टप्प्यातील २ हजार ४८७ एकर क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे २०२१ मध्येच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे उद्योगांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांच्या उभारणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. 'एनआयसीडीसी'च्या प्रामुख्याने महाराष्ट्रातील ऑरिक (छत्रपती न्यूजलेटरमध्ये संभाजीनगर), गुजरातमधील डोलेरा, उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोयडातील आयआयटी, मध्यप्रदेशातील विक्रम उद्योगपुरी यांसह २० हुन अधिक औद्योगिक क्षेत्रांची तुलना करण्यात आली आहे. देशातील ११ औद्योगिक कॉरिडॉर, १३ राज्यांतील २० प्रकल्प आणि विविध औद्योगिक स्मार्ट सिटींच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला चालना देण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. यातील महाराष्ट्राच्या ऑरिक प्रकल्पाला महत्त्वाचे स्थान आहे.

वाहननिर्मिती, इलेट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ऑरिकचा विकास महत्त्वाचा ठरत आहे. गुंतवणुकीची क्षमता, रोजगारनिर्मिती, औद्योगिक भूखंडांचे वाटप आणि चाचणी सुविधांची उपलब्धता या बाबींमुळे छत्रपती संभाजीनगरचा औद्योगिक विकास राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉरच्या व्यापक आराखड्यात ठळकपणे नोंदविला गेला आहे.

शेंद्रा- बिडकिनमध्ये एकरी १.६२ कोटीचा दर

'एनआयसीडीसी'ने देशातील ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट सिटींसाठी जाहीर केलेल्या अंदाजित जमीनदरांच्या तुलनेतही ऑरिकचा समावेश आकर्षक दराच्या यादीत आहे. शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील जमिनीचा अंदाजित दर एकरी १.६२ कोटी रुपये दर्शविण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यात हा दर आणखी वाढला आहे. याच दराने गुजरातमधील धोलेरा औद्योगिक क्षेत्रातील जमीनही उपलब्ध असल्याचे न्यूजलेटरमधील तुलनात्मक तक्त्यात नमूद आहे.

उद्योगांसाठी राहणार टेस्टिंग लॅबची सुविधा

औद्योगिक विकासाला पूरक ठरणारी आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ऑरिकमध्ये सुरू झालेले नॅशनल टेस्ट हाऊसचे (एनटीएच) सॅटेलाइट टेस्टिंग लॅबोरेटरी आणि सॅम्पल कलेक्शन सेंटर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते १९ जून २०२६ रोजी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. एनआयसीडीसीच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले हे केंद्र शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील उद्योगांना चाचणी, कॅलिब्रेशन, नमुना संकलन आणि गुणवत्ता तपासणीच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

India Forex Reserves : रुपयाला मिळाला मोठा आधार! अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत; परकीय चलन साठ्यात वाढ

Health tips: नेल एक्स्टेंशन करण्यापूर्वी सावधान! नखांचे सौंदर्य वाढवणारी ही फॅशन ठरू शकते नुकसानकारक जाणून घ्या दुष्परिणाम

Typing Exam Update: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! परीक्षा सुरू होण्यापूर्वी 'हा' तपशील तपासून घेण्याचे आवाहन

IPL 2027 Auction: 66 जागा अन् 1220 दावेदार! IPL 2027 ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पडणार; कोणत्या खेळाडूंचं नशीब चमकणार?

भारतीय बाजारात Motorola चा नवा डाव; 144Hz डिस्प्लेसह जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून व्हाल थक्क