शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचत असल्याचे याचिकेत नमूद
ऊस संशोधन केंद्राच्या अहवालाचाही याचिकेत आधार
उसाला प्रति टन ४,५०० रुपये पहिला हप्ता देण्याची शेतकऱ्यांची मागणी
Sugarcane Farmers PIL : छत्रपती संभाजीनगर केंद्र सरकारने २०२६-२७च्या गाळप हंगामासाठी उसाचा प्रतिटन३.६५० रुपये एफआरपी निश्चित केला असताना, काही साखर कारखान्यांनी त्यापेक्षा कमी दर जाहीर केल्याच्या मुद्दयावरून औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात कायद्याने बंधनकारक असलेले ऊस नियंत्रण मंडळ स्थापन न केल्याने कारखान्यांकडून दर निश्चितीमध्ये मनमानी होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
या याचिकेवर ३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र ऊस दर नियमन अधिनियम, २०१३ च्या कलम ३ नुसार राज्य सरकारने ऊस नियंत्रण मंडळ स्थापन करणे बंधनकारक आहे.
या मंडळाच्या माध्यमातून साखर कारखान्यांच्या उत्पन्नातील शेतकऱ्यांचा हिस्सा निश्चित करून अंतिम ऊसदर ठरविण्याची तरतूद आहे. मात्र, मंडळाची स्थापना न झाल्याने कारखाने स्वतःच्या मर्जीने दर जाहीर करत असून, ही कायद्याची पायमल्ली असल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३,२०० रुपये, अशोक सहकारी साखर कारखान्याने ३,१५० रुपये, तर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ३,२०० रुपये दर जाहीर केला आहे. केंद्र सरकारने निक्षित केलेल्या एफआरपीपेक्षा हे दर कमी असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातील पाडेगाव केंद्रीय ऊस संशोधन केंद्राच्या अहवालाचाही याचिकेत आधार घेण्यात आला आहे. सीओ ८६०३२ या ऊस वाणाचा साखर उतारा १३.६९ ते १५.७५ टक्के असल्याचे नमूद करत, एका टन उसापासून सुमारे १३६.९ किलो साखर मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे. साखरेचा दर प्रतिकिलो ५५ रुपये गृहीत धरल्यास प्रतिटन उसापासून ७,५२९ रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. याशिवाय इथेनॉल, बर्गस आणि मोर्लेसेस या उपपदार्थांतूनही कारखान्यांना उत्पन्न मिळते.
ऊस उत्पादकांना पहिला हप्ता प्रतिटन ४,५०० रुपये देण्यात यावा आणि साखर व अन्य उपपदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे रंगराजन समितीच्या ७०:३० सूत्रानुसार वाटप करून अंतिम ऊसदर निश्चित करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. महाराष्ट्र ऊस दर नियमन अधिनियमाच्या कलम ४(अ) नुसार उत्पन्न वाटपाच्या सूत्राची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.