धाराशिवचा पाणीसाठा ५.३४ टक्क्यांवर; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरनाईकांचा ॲक्शन प्लॅन  धाराशिवचा पाणीसाठा ५.३४ टक्क्यांवर; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरनाईकांचा ॲक्शन प्लॅन
महाराष्ट्र

Dharashiv Water Crisis: धाराशिवचा पाणीसाठा ५.३४ टक्क्यांवर; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरनाईकांचा ॲक्शन प्लॅन

Dharashiv Water Crisis: धाराशिव जिल्ह्यातील पाणीसाठा घसरून ५.३४ टक्क्यांवर आल्याने पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, पर्यायी जलस्रोत आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

श्वेता झगडे
  • धाराशिवमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद

  • पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

  • प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मंत्रालयात बैठक

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जिल्ह्यातील गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२५ नोव्हेंबर) मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासह संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत.(Dharashiv Water Crisis)

पाणीसाठ्याची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक

धाराशिव जिल्ह्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. अवघ्या एका महिन्यात जिल्ह्यातील पाणीसाठा सुमारे आठ टक्क्यांवरून घसरून ५.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत धाराशिवमधील पाणीटंचाईची वस्तुस्थिती मांडली होती. तसेच जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि पर्यायी जलस्रोतांवर भर

बुधवारी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यावर चर्चा होईल. ज्या भागांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी आहे, तेथे पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन, संभाव्य टंचाईग्रस्त गावांची ओळख आणि पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी यावरही चर्चा होणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण बैठकीला पाणीपुरवठा, जलसंपदा, ग्रामविकास तसेच मृद व जलसंधारण विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.

गावागावातील पाणीटंचाई रोखण्यासाठी नियोजन

जिल्ह्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, ही भूमिका पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात आणि धाराशिव जिल्ह्यासाठी विशेष पाणीपुरवठा नियोजन किंवा आर्थिक मदतीबाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

भाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडक; गाडी झाली पलटी

भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार; भारत शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करणार

JEE NEET Update: कोचिंग क्लासेसना बसणार चाप! पुन्हा एकदा १२ वीच्या मार्क्सवर ठरणार विद्यार्थ्यांची रँक?

मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर Prasad Oakची Bollywoodमध्ये झेप! हिंदी सिनेमात करणार दमदार एन्ट्री; चित्रपटाचं नाव काय?

Jio चा धमाका! कंपनीने लाँच केली Happy New Year Offer... अनलिमिटेड 4G आणि 5G डेटासह मिळणार धमाकेदार फायदे