चालकांना मराठी ज्ञान अनिवार्य, अन्यथा...; १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांचा मराठी संवाद पाठ्यक्रमात सहभाग  
मुंबई

Marathi language: चालकांना मराठी ज्ञान अनिवार्य, अन्यथा...; १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांचा मराठी संवाद पाठ्यक्रमात सहभाग

Marathi language: व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. चालकांच्या मराठी संवाद कौशल्याची तपासणी करण्यात येणार असून, आतापर्यंत १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांनी मराठी संवाद पाठ्यक्रमात सहभाग घेतला आहे.

श्वेता झगडे
  • मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
  • व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांच्या मराठी ज्ञानाची होणार तपासणी
  • १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांचा मराठी संवाद पाठ्यक्रमात सहभाग

Marathi language : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना व्यवहारिक मराठी भाषेचे (Marathi language) ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्या, १९ ऑगस्ट रोजी मोटार परिवहन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुधारित नियमांची अंमलबजावणी, चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी तसेच त्यासाठीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गातील एकूण ९ लाख ७८ हजार ५४१ वैध परवाने आहेत. यामध्ये ९ लाख १६ हजार ८८४ ऑटोरिक्षा आणि ६१ हजार ६५७ टॅक्सी परवान्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच सुमारे ४ लाख ६२ हजार ३८७ रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक आहेत.

व्यावसायिक वाहनचालक दररोज हजारो प्रवाशांशी थेट संवाद साधत असतो. त्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यासाठी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अनेक अमराठी चालकांना मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

१ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांचा उत्स्फूर्त सहभाग

परिवहन विभागाच्या पुढाकाराने गेल्या साडेतीन महिन्यांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम’ अभियानाला चालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांनी या अभियानात सहभाग नोंदवून मराठी भाषा शिकण्याची तयारी दर्शविली आहे. या उपक्रमामुळे अनेक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. मात्र, या अभियानात सहभागी न झालेल्या अथवा अद्याप व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या चालकांपर्यंतही पोहोचणे आवश्यक आहे.

परिवहन विभागाच्या पुढाकाराने मराठी भाषा शिकू इच्छिणाऱ्या चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या वर्गांचा नुकताच समारोप झाला. समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासनाचा मराठी भाषा विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन आवश्यक आर्थिक तरतूद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातूनही या अभियानाला सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे ज्येष्ठ कवी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे.

लाखो अमराठी चालकांना अद्याप व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नाही

राज्यात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गातील ९ लाख ७८ हजारांहून अधिक वैध परवाने आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी या अभियानात सहभाग नोंदविला आहे. उर्वरित अनेक चालकांना अद्याप व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नाही. अशा चालकांनी मराठी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना यापुढेही मराठी भाषा विभागाकडून सहकार्य केले जाणार आहे. परिवहन विभागाच्या वतीने १०५ दिवस राबविण्यात आलेले ‘मराठी शिका’ अभियान संपले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुढे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना परिवहन विभागाचे पूर्ण सहकार्य राहील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

कारवाईच्या कक्षेत येणाऱ्या लाखो अमराठी चालकांबाबत महत्त्वाची बैठक

नवीन नियमावलीनुसार व्यवहारिक मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. परिवहन विभागाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून १०५ दिवस ‘मराठी शिका’ हे अभियान राबविले. मात्र, आता कारवाईच्या कक्षेत येणाऱ्या उर्वरित अमराठी चालकांच्या बाबतीत नियमांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करावी, याबाबत उद्याच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

World News : चीनला प्रगत चिप्सपासून दूर ठेवणे अमेरिकेलाच पडणार महागात? तंत्रज्ञान निर्बंधांवर नव्याने चर्चा

Paras Mhambrey: IPL 2027 आधी पंजाब किंग्सचा मोठा डाव! हार्दिकनंतर मुंबई इंडियन्सचा आणखी एक PBKS च्या ताफ्यात

Home decor: घरातील कोणत्या ठिकाणी कोणती झाडे लावावीत? हॉलपासून ते बाथरूमपर्यंत जाणून घ्या योग्य रोपांची निवड!

National Gymnastics Competition : पहिल्या दिवशी सर्व्हिसेस' आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्व

Made In India उत्पादनांचा जागतिक डंका! Amazon ची भारतातून E-Commerce निर्यात 27 अब्ज डॉलर्सवर; 2030 पर्यंत 80 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य