पुण्यात म्हाडाच्या घरांची १ डिसेंबरला सोडत
एका घरासाठी ६१ लोकांमध्ये स्पर्धा
शुक्रवारी सायंकाळी पात्र अर्जदारांची अंतिम यादी
पुणे : आकाश ढुमे-पाटील : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४ हजार ४६२ घरांच्या सोडतीसाठी अर्जदारांची चुरस वाढली आहे. या सोडतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, तब्बल ५ हजार ३९८ अर्ज अपात्र ठरले आहेत. तर २ लाख ६८ हजार ६७० अर्जदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे एका घरासाठी सरासरी ६१ अर्जदारांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. येत्या १ डिसेंबर रोजी सोडत काढली जाणार असून, घर कोणाच्या नशिबी येणार, याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.
पुणे मंडळाने सोमवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री पात्र अर्जदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली. अपात्र ठरलेल्या अर्जदारांना त्यांच्या अर्जाबाबत सूचना आणि हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. या हरकतींची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर सोडतीत सहभागी होणाऱ्या अर्जदारांची निश्चित संख्या स्पष्ट होईल.
पुणे मंडळाला १५ टक्के एकात्मिक योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ही ४ हजार ४६२ घरे उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी २४ ऑगस्टपासून अर्ज नोंदणी आणि अर्जविक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे मंडळाला तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली. महाआयटी प्रणाली १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान बंद असल्याने कागदपत्रांची पडताळणीही रखडली होती.
म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रेची जय्यत तयारी; मंत्री जयकुमार गोरेंच्या आदेशानंतर प्रशासन कामाला
अखेर ३० ऑक्टोबरला अर्ज प्रक्रिया संपली. या सोडतीसाठी एकूण ३ लाख २५ हजार ७७ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २ लाख ७४ हजार ६८ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. अपात्र ठरलेल्या अर्जदारांना सूचना-हरकती नोंदविण्यासाठी काही तासांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आलेल्या सूचना-हरकती लक्षात घेऊन अर्जांची पुन्हा छाननी करून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
'हे निर्लज्जपणाचे लक्षण...', रोहित पवारांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात
या यादीत पात्र ठरलेले अर्जदार १ डिसेंबरच्या सोडतीत सहभागी होतील. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या इतिहासातील हा विक्रमी प्रतिसाद ठरला आहे. आता अंतिम पात्र यादी आणि १ डिसेंबरच्या सोडतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत किती घरांचा समावेश आहे?
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीमध्ये १५ टक्के एकात्मिक योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ४ हजार ४६२ घरांचा समावेश आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीसाठी किती अर्जदार पात्र ठरले आहेत?
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या प्रारूप यादीत २ लाख ६८ हजार ६७० अर्जदार पात्र ठरले आहेत, तर ५ हजार ३९८ अर्ज अपात्र ठरले आहेत.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांची सोडत कधी होणार आहे?
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४ हजार ४६२ घरांची सोडत येत्या १ डिसेंबर रोजी काढली जाणार आहे.