पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात धडक निष्कासन मोहीम राबविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली 'अ', 'फ' आणि 'क' क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही संयुक्त कारवाई पार पडली. या मोहिमेत अनधिकृत पत्राशेड, वाढीव ओटे आणि धोकादायक अतिक्रमणे पाडून रस्ते व पदपथ मोकळे करण्यात आले.
'अ' क्षेत्रीय कार्यालय : लोकमान्य टिळक रस्त्यावर ६४१ चौ. मीटर बांधकामावर हातोडा
'अ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील लोकमान्य टिळक रस्त्यावर असणाऱ्या 'सिटी प्राईड' या व्यावसायिक इमारतीच्या पार्किंग व तळमजल्यावर अनधिकृतपणे उभारलेल्या पत्राशेड आणि बांधकामांवर कारवाई करण्यात आली. संबंधित बांधकाम धारकांना महापालिकेकडून यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटीसची मुदत संपूनही संबंधितांनी स्वतःहून बांधकाम न काढल्याने शुक्रवारी ७ अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर निष्कासन कारवाई करत सुमारे ६४१ चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अधिपत्याखाली झालेल्या या कारवाईत उपअभियंता सुशीलकुमार लवटे, बीट निरीक्षक राहुल निकम, सुहास भगत यांच्यासह २० एमएसएफ जवान, ९ मजूर आणि १ जेसीबी ब्रेकरचा वापर करण्यात आला.
'फ' क्षेत्रीय कार्यालय: चिखली व तळवडे परिसरात २५० मिळकतींवरील अतिक्रमणे हटवली
'फ' तोरणा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक १ (दक्षिण भाग, चिखली) आणि प्रभाग क्रमांक १२ (तळवडे) येथील अतिउच्च दाब विद्युत वाहिनीखालील (टॉवर लाईन रस्ता) दोन्ही बाजूस धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई करण्यात आली. सुमारे १.८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील २५० मिळकतींवर कारवाई करत अनधिकृत पत्राशेड, दुकानांसमोरील वाढीव ओटे असे सुमारे १६,५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. अतिक्रमण विभाग व 'फ' क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल भोकरे, ऐश्वर्या मासाळ आणि सूरज माने यांनी ही मोहीम फत्ते केली. यावेळी ५ अतिक्रमण पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) २६ जवान, ४ मनपा मजूर, १० कंत्राटी मजूर, ३ जेसीबी आणि १ ट्रॅक्टर ब्रेकर तैनात करण्यात आले होते.
'क' क्षेत्रीय कार्यालय: संभाजीनगर व कामगार नगर परिसरात २४ पत्राशेडवर कारवाई
'क' विजयदुर्ग क्षेत्रीय कार्यालय (भोसरी) अंतर्गत संभाजीनगर (प्रभाग क्र. १०) येथील थर्मॅक्स चौक ते कस्तुरी मार्केट परिसरात एकूण २४ अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. यासोबतच पिंपरीतील कामगार नगर (प्रभाग क्र. ९) परिसरातील अनधिकृत पत्राशेड हटवून नागरिकांसाठी फुटपाथ मोकळे करण्यात आले. या मोहिमेत ४ बीट निरीक्षक, ४ महापालिका कर्मचारी, १४ एमएसएफ जवान, २ कॅमेरामन आणि ३ वाहनचालकांच्या पथकाने सहभाग घेतला.
पिंपरी-चिंचवडमध्ये कुठे अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली?
‘अ’, ‘फ’ आणि ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. लोकमान्य टिळक रस्ता, चिखली, तळवडे, संभाजीनगर आणि कामगार नगर परिसरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्यात आली.
कारवाईत किती अतिक्रमणे हटविण्यात आली?
लोकमान्य टिळक रस्त्यावर सात अनधिकृत पत्राशेड व बांधकामे हटवून सुमारे ६४१ चौ. मीटर जागा मोकळी करण्यात आली. चिखली-तळवडे येथे २५० मिळकतींवरील सुमारे १६,५०० चौ. फूट अतिक्रमण हटविण्यात आले. संभाजीनगरमध्ये २४ अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.
कारवाई कोणाच्या आदेशानुसार करण्यात आली?
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त निष्कासन मोहीम राबविण्यात आली. यात महापालिका कर्मचारी, एमएसएफ जवान, मजूर आणि जेसीबी यांचा वापर करण्यात आला.