भविष्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता
मेंदडी धरण सहा गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा आधार
पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी उपलब्ध जलस्त्रोतांचे संरक्षण करणं गरजेचं
म्हसळा: म्हसळा तालुक्यातील सहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या मेंदडी धरणाच्या भविष्यातील सुरक्षिततेचा आणि संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी मेंदडी धरणाला प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. सुमारे ४० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या धरणाची झालेली झीज, धरणाच्या सुरक्षिततेला निर्माण झालेला संभाव्य धोका आणि मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ यामुळे भविष्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने खासदार सुनील तटकरे यांचा हा पाहणी दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
धरणाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंत बांधणे, आवश्यक ठिकाणी नवीन बंधारा उभारणे तसेच धरणातील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविणे या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. केवळ तात्पुरती डागडुजी न करता धरणाच्या दीर्घकालीन सुरक्षिततेचा विचार करून आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
मेंदडी येथील हे धरण मेंदडी गावासह तुरंबाडी, काळसुरी, वारळ, मेंदडी कोड आणि मेंदडी आदिवासी वाडी अशा सहा गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण परिसराच्या पाणीपुरवठ्याशी निगडित आहे.
धरणाचे वय, बांधकामाची झालेली झीज आणि गाळ साचल्यामुळे कमी होत चाललेली पाणीसाठवण क्षमता या वाबी भविष्यातील पाणी नियोजनाच्या दृष्टीने चिंताजनक आहेत.
पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. धरणाची तांत्रिक तपासणी करून आवश्यक कामाचा आराखडा तयार करावा, प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया गतिमान करावी आणि प्रत्यक्ष कामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.- सुनील तटकरे, खासदार
या पाहणी दौऱ्यावेळी उद्योजक जमीर नजीर, रायगड जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, म्हसळा पंचायत समिती सभापती बबन मनवे, उपसभापती लहूशेठ म्हात्रे, तहसीलदार सचिन खाडे, राजेंद्र घोसाळकर, मोरेश्वर पाटील, रमेश डोळकर, अनंत पाटील, चंद्रकांत भगत उपस्थित होते.
मेंदडी येथील उद्योजक जमीर नजीर आणि परिसरातील नागरिकांनी धरणाच्या दुरवस्थेबाबत खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. धरणाच्या सुरक्षिततेसाठी मजबूत संरक्षण भिंत, नवीन बंधारा आणि गाळ उपसा करण्याची मागणी त्यांनी केली होती. नागरिकांनी मांडलेल्या या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार तटकरे यांनी प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी उपलब्ध जलस्त्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
मेंदडी धरणाच्या बाबतीतही भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
सहा गावांच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे खासदार तटकरे यांनी गांभीर्याने लक्ष दिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.
आता प्रशासनाकडून या निर्देशांची कितपत तत्परतेने अंमलबजावणी होते आणि प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.