नवी मुंबईत गेल्या ६५ वर्षांपासून आळंदीच्या कार्तिकी वारीची पायी परंपरा जपली जात आहे.
यंदा नवी मुंबईतील पाच प्रमुख दिंड्या कार्तिकी वारीसाठी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत
लहान मुलांपासून ते ८० वर्षांवरील ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील वारकरी वारीत सहभागी होतात.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीप्रमाणेच कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या उत्पत्ती एकादशीनिमित्त स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथून पायी वारीच्या परंपरेला सुरुवात झाली. ही परंपरा वारकरी संप्रदाय गेल्या ६५ वर्षांपासून जपत आलेले आहे. यावर्षी देखील सुद्धा वारकरी संप्रदाय मोठ्या उत्साहात पायी वारीमध्ये सहभागी झाले आहेत.
संतांच्या विचारांचा वारसा, समतेचा संदेश आणि विठ्ठलभक्तीची अखंड परंपरा जपणारी पायी वारी शेकडो वर्षापासून अविरत सुरू आहे. काळ बदलला, आधुनिकतेने जीवनशैली बदलली, शहरांचा चेहरामोहरा बदलला; मात्र वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची ओढ आजही तसूभरही कमी झालेली नाही. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतही गेल्या ६५ वर्षांपासून पायी वारीची परंपरा जपली जात आहे. यंदाही नवी मुंबईतील पाच दिंड्या कार्तिकी वारीसाठी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. काही दिंड्यांचे प्रस्थान झाले असून, काही दिंड्या लवकरच विठुनामाचा गजर करीत वारीला निघणार आहेत.
वारकरी संप्रदाय ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी चळवळ आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत बहिणाबाई, संत गोरोबा कुंभार, संत नरहरी सोनार आणि संत निळोबाराय अशा संतांनी आपल्या अभंग, ओव्या आणि साहित्याच्या माध्यमातून
विषमतेवर प्रहार केला. संतविचारांची हीच अक्षय शिदोरी आजही वारकऱ्यांना प्रेरणा देत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालणारे लाखो वारकरी हे भक्तीबरोबरच शांतता, संयम आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरले आहेत. नवी मुंबईतून आळंदी दिशेने पाच प्रमुख दिंड्या प्रस्थान करतात. या दिंड्यांमध्ये शहरातील विविध गावांतील सुमारे तीन ते चार हजार वारकरी सहभागी होतात. लहान मुलांपासून ते 80 वर्षांवरील ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील वारकरी विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन पायी प्रवास करतात.
वारीच्या प्रवासात वारकऱ्यांना भोजन, नाश्ता आणि अन्य आवश्यक सुविधा विनामूल्य पुरवल्या जातात.
नवी मुंबईतून निघणाऱ्या दिंड्यांचे विविध गावांमध्ये उत्साहात स्वागत केले जाते.
अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून वारकऱ्यांसाठी भोजन, नाश्ता, धान्य तसेच आवश्यक किराणा साहित्य उपलब्ध करून दिले जाते.
दिंडीतील महिला आणि पुरुष वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी एकत्रितपणे स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे वारीत भक्तीबरोबरच सेवाभाव आणि सामूहिक जीवनाचा अनुभवही मिळतो.
आज नवी मुंबई महानगराच्या वेगवान जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत.
नव्या पिढीसमोर आधुनिकतेची अनेक आव्हाने असतानाही गावागावांतील वारकरी मंडळांनी वारीची परंपरा जिवंत ठेवली आहे.
नवी मुंबईतील पायी वारीची परंपरा सुरू करण्यामध्ये कोपरखैरणे गावातील वैकुंठवासी आदितवार महाराज म्हात्रे यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले जाते. त्यांनी सर्वप्रथम पायी वारीची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यानंतर घणसोली गावातील वैकुंठवासी संत तुकाराम महाराज रानकर वारकरी मंडळाने ही परंपरा पुढे नेली. या मंडळाचे यंदा 44 वे वर्ष असून, दिंडीची धुरा दिंडीचालकमालक ह.भ.प. सुनील रानकर सांभाळत आहेत. नवी मुंबईतून निघणाऱ्या प्रमुख दिंड्यांमध्ये घणसोली येथील श्री संत तुकाराम महाराज रानकर वारकरी मंडळ, कोपरखैरणे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी वारकरी मंडळ, वैकुंठवासी एकनाथ म. वारकरी मंडळ, वाशी गावातील वैकुंठवासी रमण महाराज पाटील वारकरी मंडळ आणि करावे येथील ह.भ.प. विलास म. तांडेल यांच्याशी संबंधित वारकरी मंडळाच्या दिंडीचा समावेश आहे. या दिंड्यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील वारकरी दरवर्षी आळंदीच्या वारीत सहभागी होतात.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)