सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी पुढाकार
रवी राम कलोसे यांचा अधिकाऱ्यांना आदेश
आरोग्य, सुरक्षा आणि वेतनावर भर
वाशिम: सफाई कर्मचाऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यांना सन्मानजनक वागणूक देऊन त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी रामू कलोसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाच्या सुविधा, आरोग्य व सुरक्षा, वेतन, पदोन्नती, सेवानिवृत्ती लाभ आणि विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा कलोसे यांनी घेतला. यावेळी वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, अपर पोलिस अधीक्षक लता फड आणि नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड उपस्थित होते. जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींमध्ये एकूण १ हजार २५ सफाई कर्मचाऱ्यांची नोंद आहे. त्यामध्ये स्थायी, अस्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी नमस्ते योजनेंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यशाळा, प्रशिक्षण, पीपीई किट वाटप तसेच आयुष्मान कार्ड नोंदणी उपक्रम राबवावेत. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वितरण करून कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपकरणांचा नियमित वापर सुनिश्चित करावा. आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट स्थापन करावे. असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा, २००८ नुसार वेतन मिळेल, याची खात्री करण्यासाठी कंत्राटदारांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही कलोसे यांनी दिले.
पात्र कर्मचाऱ्यांना आयुष्मान कार्ड आणि नमस्ते कार्ड उपलब्ध करून देणे, नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक प्रशिक्षण, निवासस्थानांचे स्ट्रक्चरल ऑडिट, प्रलंबित सेवा विषयक प्रकरणांचा निपटारा तसेच पदोन्नतीबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सफाई कर्मचारी हे शहराच्या स्वच्छतेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून, त्यांना सुरक्षित कार्यपरिसर, समानतेची वागणूक आणि सन्मानाचे जीवन मिळणे आवश्यक आहे, असे कलोसे यांनी सांगितले.