शिखंडी हा महाभारतातील एक महत्त्वाचा योद्धा होता.
अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना भीष्मांनी स्वयंवरातून हस्तिनापूरला आणले होते.
शिखंडी हा पूर्वजन्मातील काशीराज कन्या अंबाचा पुनर्जन्म होता.
शिखंडी हा महाभारतातील एक महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा योद्धा होता. पूर्वजन्मातील काशीराज कन्या अंबा हिचा पुनर्जन्म शिखंडीच्या रूपात झाला आणि पितामह भीष्मांच्या पतनास तो कारणीभूत ठरला. कारण पितामह भीष्मांनी स्त्री किंवा जन्माने स्त्री असलेल्या व्यक्तीवर शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केल्यामुळे शिखंडी समोर असताना त्यांनी युद्ध करण्यास नकार दिला. ही कथा आहे हेच सविस्तर माहिती करुन घेऊया.
पाचाल नरेश राजा द्रुपद यांच्या पोटी शिखंडीचा जन्म शिखंडिनी या कन्येच्या रूपात झाला. द्रौपदी आणि धृष्टद्युम्न यांचा तो थोरला भाऊ होता. राजा द्रुपदाने शिखंडिनीला मुलाप्रमाणेच वाढवले आणि तिला सर्व युद्धकलेचे शिक्षण दिले. मोठे झाल्यावर तिचा विवाह एका राजकन्येशी झाला. मात्र, शिखंडिनी जन्माने स्त्री असल्याचे पत्नीला समजल्यावर मोठा पेच निर्माण झाला. निराश होऊन शिखंडिनी वनात गेली, तेथे स्थूणकर्ण नावाच्या यक्षाने तिला आपले पुरुषत्व दिले आणि तिचे स्त्रीत्व स्वतःकडे घेतले. त्यानंतर शिखंडी पुरुष म्हणून ओळखला जाऊ लागला.
शिखंडीच्या पूर्वजन्माची कथा काशीच्या राजकन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांच्याशी जोडलेली आहे.. हस्तिनापूरचे भीष्म यांनी आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य याच्यासाठी या तिन्ही बहिणींचे स्वयंवरातून अपहरण केले. अंबाचे सौभ देशाचा राजा शाल्व याच्यावर प्रेम होते आणि तिने हे भीष्मांना सांगितले. भीष्मांनी तिला शाल्वकडे जाण्याची परवानगी दिली. परंतु, शाल्वने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. विचित्रवीर्यानेही तिला नाकारले. मग अंबा पुन्हा भीष्मांकडे गेली आणि तिने त्यांच्याशी विवाह करण्याची विनंती केली, पण आजीवन ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे भीष्मांनी नकार दिला. अंबाने परशुरामांची मदत घेतली; परशुराम आणि भीष्म यांच्यात मोठे युद्ध झाले, पण त्यात कोणाचाही निर्णायक विजय झाला नाही.
शेवटी अंबाने भगवान शंकराची कठोर तपस्या करून भीष्माच्या मृत्यूचे कारण बनण्याचा वर मिळवला. त्यानंतर तिने प्राण त्यागले आणि तीच द्रुपद राजाच्या घरी शिखंडीच्या रूपात जन्माला आली. आणि तिचं पुढे भीष्म यांच्या मृत्यूचे कारण बनली.
महाभारत युद्धाच्या दहाव्या दिवशी पांडवांनी शिखंडीला पुढे करून भीष्मांवर आक्रमण केले. भीष्म शिखंडीसमोर शस्त्र न उचलण्यामागे काही कराणे होती.
शिखंडी हा पूर्वजन्मीची अंबाच आहे आणि तिचा जन्म केवळ आपल्या वधासाठी झाला आहे, हे पितामह भीष्म जाणत होते. भीष्मांनी स्त्री किंवा जन्माने स्त्री असलेल्या व्यक्तीशी युद्ध न करण्याचे व्रत पाळले होते. शिखंडी हा मूळचा स्त्री असल्याने, त्याच्यावर बाण चालवणे आपल्या व्रताविरुद्ध आहे असे भीष्म मानत होते. शिखंडीसमोर असताना भीष्मांनी धनुष्य खाली ठेवताच, शिखंडीला पुढे करून त्याच्या आडून अर्जुनाने भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे भीष्म शरपंजरी पडले.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)