भारत-पाकिस्तान सामन्यामुळे हँडशेक वाद समोर
मोठे राजकीय मुद्दे आमच्या नियंत्रणाबाहेर
वरून आदेश आल्यास हस्तक्षेप अशक्य
Handshake Controversy : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन (हँडशेक) न करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या वादावर मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (MCC) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजकीय परिस्थितीचा प्रभाव खेळावर पडत असेल, तर खेळाडूंना हस्तांदोलन करण्यास भाग पाडणे आपल्या नियंत्रणात नसल्याचे MCCने मान्य केले आहे. मात्र, क्रिकेटमधील खेळाडूवृत्ती आणि परस्पर सन्मान कायम राहावा, अशी अपेक्षाही क्लबने व्यक्त केली.
एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पारंपरिक हस्तांदोलनाची पद्धत बंद झाल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेकीच्या वेळी तसेच सामना संपल्यानंतरही दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हात मिळवणे टाळत आहेत.
पुरुष, महिला आणि विविध वयोगटांतील सामन्यांमध्येही हा प्रकार दिसून आला आहे. रविवारी दोहा येथे झालेल्या भारत-ए आणि पाकिस्तान-ए यांच्यातील एसीसी मेंस आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील सामन्यातही हस्तांदोलन झाले नाही.
एमसीसीचे क्रिकेट विभागाचे प्रमुख फ्रेझर स्टीवर्ट यांना खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यास क्रिकेटमधील खेळाडूवृत्ती जपणे कठीण होत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राजकीय आणि भू-राजकीय मुद्दे क्रिकेटच्या कक्षेबाहेर असल्याचे स्पष्ट केले.
शारजाह येथे आयएलटी-20 स्पर्धेदरम्यान बोलताना स्टीवर्ट म्हणाले, काही परिस्थिती अशा असतात, ज्या क्रिकेटच्या पलीकडे असतात. भू-राजकीय मुद्द्यांशी संबंधित या गोष्टी अशा पातळीवरून येतात, ज्यावर भाष्य करणे माझ्या अधिकारक्षेत्राबाहेर आहे.
ते पुढे म्हणाले, खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करावे, अशी एमसीसीची इच्छा आहे. मात्र, मैदानावर घडणाऱ्या गोष्टींवरच आमचे नियंत्रण असते. खेळाडूंनी एकमेकांचा, पंचांचा आणि त्यांच्या निर्णयांचा तसेच खेळाचा आदर करावा, एवढेच आम्ही सुनिश्चित करू शकतो.
खेळाडूंना वरिष्ठ स्तरावरून किंवा राजकीय नेतृत्वाकडून हस्तांदोलन न करण्याचे निर्देश दिले जात असतील, तर त्यामध्ये हस्तक्षेप करून निर्णय बदलणे एमसीसीला शक्य नसल्याचेही स्टीवर्ट यांनी स्पष्ट केले. वरच्या स्तरावरून हस्तांदोलन करू नका, असे आदेश येत असतील, तर एमसीसी त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. खेळाडूंनी हात मिळवावेत, अशी आमची इच्छा आहे. मात्र, त्यामागे असलेले मोठे मुद्दे आमच्या पूर्णपणे नियंत्रणाबाहेर आहेत, असे ते म्हणाले.