एक्सवरील टीनेजर्सच्या अकाऊंटसाठी पॅरेंटल कंट्रोल फीचर जारी
13 ते 17 वर्षीय यूजर्सचे अकाऊंट्स डिफॉल्ट स्वरुपात प्रोटेक्टेड मोडमध्ये सेट केले जाणार
पालकांना मुलांच्या एक्स अकाऊंटसाठी डेली लिमिट सेट करण्याचा पर्याय मिळणार
एलन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) यूजर्ससाठी एक नवीन फीचर जारी करण्यात आले आहे. आता या फीचरनंतर मुलांच्या एक्स अकाऊंटचा कंट्रोल पालकांकडे असणार आहे. एक्सवरील टीनेजर्सच्या अकाऊंटसाठी पॅरेंटल कंट्रोल फीचर जोडण्यात आले आहे. या नव्या फीचरमुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या एक्स अकाऊंटवर कंट्रोल ठेवण्याचा पर्याय मिळणार आहे. मुलं प्लॅटफॉर्म कोणत्या प्रकारचा कंटेट बघत आहेत आणि कोणासोबत इंटरॅक्ट करत आहेत, यावर पालकांची नजर असणार आहे. मात्र, इतर अनेक प्लॅटफॉर्म्स ज्या प्रकारे अशी नियंत्रणे लागू करतात, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने 'एक्स' ने यामध्ये एक बदल केला आहे. त्यांनी किशोरवयीन मुलांना या विषयावर आपले मत मांडण्याचा आणि त्याबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार दिला आहे.
कंपनीने सांगितलं आहे की, 13 ते 17 वर्षीय यूजर्सचे अकाऊंट्स डिफॉल्ट स्वरुपात प्रोटेक्टेड मोडमध्ये सेट केले जाणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, एक्सवरील टीनेजर्सच्या अकाऊंटवर सेंसिटिव कंटेंट दाखवला जाणार नाही आणि त्यांना टारगेटेड जाहिराती देखील दिसणार नाहीत. तथापी, एक्सवरील टीनेजर्स यूजर्सना त्यांच्या अकाऊंट्सवर काही प्रमाणात कंट्रोल ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. यामुळे यूजर्स पाहू शकतील की, अकाऊंटमध्ये कोणते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पालक त्यांच्या मुलांच्या अकाऊंटवरील वैयक्तिक मेसेज वाचू शकणार नाहीत, तसेच पालक मुलांची सर्च हिस्ट्री देखील पाहू शकत नाही आणि मुलांच्या वतीने कोणतीही पोस्ट देखील शेअर करू शकत नाही. (फोटो सौजन्य: Pinterest)
पॅरेंटल कंट्रोल फीचरमध्ये पालकांना पुढील सुविधा मिळणार आहेत
पालक पाहू शकतात की, त्यांचा मुलगा प्रत्येक आठवड्याला किती वेळ एक्स प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे.
पालकांना मुलांच्या एक्स अकाऊंटसाठी डेली लिमिट सेट करण्याचा पर्याय मिळणार आहे.
नवीन फॉलोवर्ससाठी पालकांची परवानगी गरजेची आहे
फीड रिकमेंडेशंस आणि व्हिडीओ केवळ तुम्ही आधीच फॉलो करत असलेल्या अकाऊंटपुरते मर्यादित असणार
विशेष शब्द फील्टर केले जाणार
सेंसिटिव्ह मीडिया बंद केला जाणार
पालक ठरवू शकतात की, मुलांना DM (डायरेक्ट मेसेज) कोण पाठवू शकतं.
काही महिन्यांपूर्वी एक्सवर टीका करण्यात आली होती की, प्लॅटफॉर्मवरील एआय चॅटबोटचा वापर करून लहान मुलं आणि स्त्रियांचे चुकीच्या पद्धतीने तयार केले जाणारे फोटो रोखण्यासाठी प्लॅटफॉर्मवर पुरेसे कंट्रोल्स नाहीत. अशातच आता कंपनीने मुलांच्या अकाऊंटची सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन फीचर सादर केले आहे.