अवकाशात उभारणार दहा लाख सॅटेलाइट्सचे नेटवर्क
सूर्यप्रकाशाचा फायदा; पण उष्णता नियंत्रणाचे मोठे आव्हान
तज्ज्ञांकडून शंका; अंतराळातील कचऱ्याचा धोकाही वाढणार
World News : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आणखी एक मोठा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत. पृथ्वीवरील वाढती वीजटंचाई, डेटा सेंटर्सचा प्रचंड खर्च आणि AI तंत्रज्ञानाची वाढती मागणी लक्षात घेऊन मस्क यांना AI डेटा सेंटर्स थेट अवकाशात उभारायची आहेत.
विशेष म्हणजे, अवकाशात जवळपास सतत उपलब्ध असणाऱ्या सूर्यप्रकाशाचा वापर करून या डेटा सेंटर्सना ऊर्जा पुरवण्याची त्यांची योजना आहे. मात्र, ही कल्पना प्रत्यक्षात आणणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या कितपत शक्य आहे, यावर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
एलॉन मस्क यांची कंपनी SpaceX या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर उपग्रहांचे नेटवर्क उभारण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पाला 'Starmind' असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या Federal Communications Commission (FCC) ने SpaceX ला अवकाशात तब्बल १० लाख उपग्रह तैनात करण्यास परवानगी दिली आहे. या उपग्रहांवर AI डेटा प्रोसेसिंगची क्षमता विकसित करण्याचा उद्देश आहे.
या यंत्रणेद्वारे अवकाशातच मोठ्या प्रमाणावर संगणकीय प्रक्रिया करून त्याचा उपयोग पृथ्वीवरील AI सेवांसाठी करता येणार आहे. मस्क यांच्या मते, अवकाशातील सूर्यप्रकाशाचा वापर केल्यास पृथ्वीवरील वीजपुरवठ्यावरचा ताण कमी होऊ शकतो. मात्र, प्रत्यक्ष उपग्रहांची उभारणी आणि तैनातीसाठी अनेक वर्षे लागणार आहेत.
अवकाशात सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळवणे हा या योजनेचा सर्वात मोठा फायदा मानला जात आहे. पृथ्वीवरील डेटा सेंटर्सना मोठ्या प्रमाणात वीज आणि पाणी लागते. त्याचबरोबर सर्व्हरमधून निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी महागड्या कूलिंग यंत्रणा वापराव्या लागतात.
मात्र, अवकाशातही उष्णता नियंत्रण सोपे नाही. तिथे हवा नसल्यामुळे पारंपरिक पद्धतीने उष्णता बाहेर काढता येत नाही. त्यासाठी मोठ्या रेडिएटर यंत्रणा उभाराव्या लागतील. याशिवाय उपग्रहांची दुरुस्ती, देखभाल, अंतराळातील किरणोत्सर्ग आणि पृथ्वीशी वेगवान डेटा कनेक्टिव्हिटी राखणे हीदेखील मोठी आव्हाने आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत वैज्ञानिक आणि पर्यावरणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. लाखो उपग्रह अवकाशात पाठवल्यास त्यांच्यात टक्कर होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अंतराळातील कचऱ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय रॉकेट प्रक्षेपण आणि उपग्रह पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना होणाऱ्या प्रदूषणाबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
SpaceX ला पहिला उपग्रह २०३३ पर्यंत तैनात करण्याची अट आहे. २०३८ पर्यंत अर्धे नेटवर्क आणि २०४० पर्यंत उर्वरित उपग्रह तैनात करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मस्क यांची ही कल्पना प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण टेक्नॉलॉजी जगाचे लक्ष लागले आहे.