फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे खूप मोठे आहे, त्यामुळेच जगभरातील अनेक ऑटो कंपन्या या क्षेत्रात दमदार कार्स लाँच करत आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. यातीलच एक विदेश ऑटो कंपनी म्हणजे किया मोटर्स. कियाने भारतीय ग्राहकांच्या मागणी आणि आवडीनुसार उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार्स मार्केटमध्ये आणल्या आहेत. पण आता ही कंपनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे कंपनीच्या प्लांटमध्ये चक्क इंजिनची चोरी झाली आहे.
किया मोटर्स इंडियाच्या आंध्र प्रदेशातील प्लांटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर, किया मोटर्सच्या श्री सत्य साई जिल्ह्यातील पेनाकोंडा जवळ कार उत्पादन कारखाना आहे. गेल्या पाच वर्षांत या कारखान्यातून सुमारे 900 इंजिन चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या मार्चमध्ये कंपनीने पूर्ण वर्षाचे ऑडिट केले तेव्हा ही बाब उघडकीस आली. एका अहवालानुसार, किआ मोटर्स सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास कचरत होती. पोलिसांनी औपचारिक तक्रारीशिवाय प्रकरणाचा तपास करावा अशी त्यांची इच्छा होती, परंतु पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले की तक्रारीशिवाय तपास करता येणार नाही. यानंतर, किया मोटर्सने 19 मार्च रोजी पेनाकोंडा इंडस्ट्रियल इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
फक्त 11 हजारांचे डाउन पेमेंट आणि Royal Enfield Classic 350 होईल तुमची, दरमहा द्यावा लागेल इतकाच EMI?
या घटनेननंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. श्री सत्य साई जिल्ह्याचे एसपी व्ही रत्ना यांनी किया मोटर्सच्या कारखान्याला भेट दिली आणि सर्व नोंदी तपासल्या. ते म्हणाले, “या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही तीन विशेष पथके तयार केली आहेत. आमची पथके देशभरात जाऊन महत्त्वाची माहिती गोळा करत आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.” पेनाकोंडाचे डीएसपी वाय वेंकटेश्वरुलु हे देखील या तपास पथकाचा भाग आहेत. त्यांनी सांगितले की, 2020 मध्ये किया मोटर्समध्ये इंजिन चोरी सुरू झाली. सुरुवातीच्या तपासात गेल्या पाच वर्षांत 900 इंजिन हळूहळू आणि नियोजनबद्ध पद्धतीने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. हे निश्चितच एका आतल्या व्यक्तीचे काम असणार आहे. किया मोटर्सच्या काही माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांनी मिळून ही चोरी केल्याचा आम्हाला संशय आहे.
Fronx Vs Taisor: किंमत, मायलेज आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती एसयूव्ही आहे बेस्ट?
सुरुवातीला, पोलिसांना संशय होता की तामिळनाडूहून पेनाकोंडा येथील किया मोटर्स प्लांटमध्ये येताना इंजिन चोरीला गेले असावेत, परंतु तपासानंतर असे आढळून आले की सर्व इंजिन प्लांटमधूनच चोरीला गेले. चोरट्यांनी रेकॉर्डमध्येही बदल केला आहे.
दुसरीकडे, कंपनीने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. कंपनी म्हणते की पोलिस अजूनही तपास करत आहेत, परंतु कंपनीने निश्चितपणे सांगितले की इंजिन चोरीचा प्लांटच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नाही.