फोटो सौजन्य: iStock
भारतात वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हिच वाढीव मागणीमुळे नवनवीन कार्स देशात लाँच होत आहे. मात्र, प्रत्येकवेळी वाहनांची विक्री वाढते असे नाही. काही वेळेस ही विक्री कमी देखील होते. याच कमी विक्रीमुळे भारतातील कार डीलर्स मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतातील कार डीलर्स सध्या एका मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. कार्सची विक्री कमी झाल्याने त्यांच्याकडे विक्री न झालेल्या वाहनांचा साठा भरपूर आहे. ज्याची किंमत तब्बल 52000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम मानली जात आहे. कंपन्या सतत नवनवीन वाहनं तयार करून बाजारात पाठवत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. गेल्या एक वर्षापासून कार डीलर्स या समस्येला तोंड देत आहेत.
Compact SUV सेगमेंटमध्ये ग्राहकांना ‘या’ कारची भुरळ, Tata आणि Kia च्या कारला सोडले मागे
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, डीलर्सकडे साधारणपणे 34 ते 38 दिवसांचा स्टॉक असतो. जर आपण वाहनांची संख्या पाहिली तर ती सुमारे 440,000 युनिट्सवर पोहोचली आहे. मे महिन्यापर्यंतचा हा आकडा गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच्या स्टॉकपेक्षा थोडा कमी आहे. दिवाळीपूर्वी डीलर्सकडे 40 ते 45 दिवसांचा स्टॉक होता. परंतु यावेळी वाहनांच्या किमतीत वाढ आणि स्टॉक जमा झाल्यामुळे एकूण किंमत खूप जास्त झाली आहे. ही माहिती काही उद्योग अधिकाऱ्यांनी दिली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या माहितीनुसार, डीलर्सकडे 52 ते 53 दिवसांचा स्टॉक असतो. मात्र, आता FADA चिंतेत आहे. यामागील कारण म्हणजे कंपन्या वाहनं पाठवत आहेत, परंतु डीलर्स ते विकू शकत नाही आहेत. डीलर्सकडे 50 दिवसांपेक्षा जास्त काळ वाहने पडीक आहेत. तर पूर्वी हा कालावधी 21 दिवसांचा होता.
कार उत्पादक कंपन्या म्हणतात की त्यांच्याकडे योग्य प्रमाणात स्टॉक उपलब्ध आहे. पण सत्य हे आहे की कार विक्रीचा वेग आता मंदावला आहे. गेल्या 8 महिन्यांतील हा सर्वात मंद वेग आहे. पहिल्यांदाच, या वर्षी इतक्या कमी कार विकल्या गेल्या आहेत. डीलर्सना पाठवलेल्या कारच्या संख्येपेक्षा ग्राहकांनी कमी कार खरेदी केल्या आहेत. मे महिन्यात एकूण 302,214 कार विकल्या गेल्या होत्या. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत हे 3.14% कमी आहे.
अपमानातून Rolls-Royce ला घडवली अद्दल ! ‘या’ व्यक्तीने कंपनीच्या कारला बनवले होते कचऱ्याची गाडी
अनेक वाहन डीलर्सने खूप जास्त स्टॉक जमा केला आहे, जो चिंतेचा विषय बनत चालला आहे. मात्र, ह्युंदाई आणि मारुतीचे अधिकारी म्हणतात की त्यांच्या डीलर्सकडे योग्य प्रमाणात स्टॉक उपलब्ध आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग म्हणाले की त्यांच्या डीलर्सकडे सुमारे चार आठवड्यांचा स्टॉक उपलब्ध आहे. त्यांनी असेही सांगितले की गेल्या वर्षीही त्यांच्याकडे तेवढाच स्टॉक उपलब्ध होता.
दुसरीकडे, मारुती सुझुकी इंडियाचे विक्री आणि मार्केटिंग प्रमुख पार्थो बॅनर्जी म्हणाले की त्यांचा स्टॉक लेव्हल गेल्या वर्षीपेक्षा चांगला आहे. हा स्टॉक सुमारे 35 दिवसांचा आहे.