रात्रीच्या वेळी हायवे किंवा मुख्य रस्त्यांवरून प्रवास करताना चालकांना एका मोठ्या आणि जीवघेण्या समस्येचा सामना करावा लागतो, ती म्हणजे समोरून येणाऱ्या वाहनांचा तीव्र प्रकाश. वाहनचालक रात्रीच्या वेळी आपल्या गाडीची हेडलाईट सतत ‘हाय-बीम’वर म्हणजेच वरच्या तीव्र प्रकाशावर ठेवतात. यामुळे समोरून येणाऱ्या दुसऱ्या चालकाचे डोळे पूर्णपणे दिपतात, रस्ता दिसणे बंद होते आणि अवघ्या काही सेकंदांत भीषण अपघात घडून येतो.
‘हाय-बीम‘मुळे नक्की काय धोका होतो?
जेव्हा एखादी गाडी समोरून हाय-बीमवर येते, तेव्हा तिच्या तीव्र प्रकाशामुळे मागच्या चालकाच्या डोळ्यांच्या बाहुल्या अचानक आकुंचन पावतात. विज्ञान आणि वैद्यकीय भाषेत याला ‘ग्लेअर’ किंवा ‘नाईट ब्लाइंडनेस’ म्हणतात.
या तीव्र प्रकाशामुळे चालकाला रस्त्यावरील खड्डे, डीवायडर किंवा रस्त्यावरून जाणारे पादचारी काही सेकंदांसाठी अजिबात दिसत नाहीत. जर गाडी ताशी ८० ते १०० किमी वेगाने धावत असेल, तर केवळ ३ सेकंदांचे हे अंधत्व गाडीला नियंत्रणाबाहेर नेण्यासाठी पुरेशी असते. या मानवी निष्काळजीपणामुळे दरवर्षी हजारो अपघात होतात.
गाडीखाली ऑईलचे डाग दिसतायत? जाणून घ्या बाईकमधून ऑईल लीक होण्याची ५ मुख्य कारणे
‘ऑटोडिमिंग‘ तंत्रज्ञान का गरजेचे आहे?
या समस्येवर केवळ वाहतूक नियम किंवा दंड करून पूर्णपणे नियंत्रण मिळवणे कठीण आहे. म्हणूनच, आधुनिक ऑटोमोबाईल क्षेत्रातील ‘ऑटोडिमिंग हेडलाईट तंत्रज्ञान’ ज्याला ऑटोमॅटिक हाय-बीम असिस्ट असेही म्हणतात. ही आजच्या काळाची गरज बनली आहे.
हे तंत्रज्ञान कसे काम करते?
या सिस्टीममध्ये गाडीच्या पुढच्या काचेवर किंवा बंपरमध्ये कॅमेरा आणि सेन्सर्स बसवलेले असतात. जेव्हा हे सेन्सर्स समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश किंवा पुढील वाहनाची टेल-लाईट पाहतील, तेव्हा ते गाडीची हेडलाईट ‘हाय-बीम’वरून आपोआप ‘लो-बीम’वर शिफ्ट करतात. समोरून जाणारे वाहन पुढे निघून गेल्यावर, रस्ता पुन्हा अंधारात असल्यास हेडलाईट आपोआप हाय-बीमवर जाते.
गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे फायदे आणि तोटे
या तंत्रज्ञानाचे फायदे
या तंत्रज्ञानामुळे चालकाला हाताने वारंवार लाईट डिम-फुल करण्याची गरज पडत नाही. समोरच्या चालकाचे डोळे दिपत नसल्यामुळे रात्रीचा प्रवास अत्यंत सुरक्षित होतो.
थोडक्यात सल्ला
सध्या भारतातील अनेक महागड्या गाड्यांमध्ये आणि प्रीमियम मॉडेल्समध्ये हे सेफ्टी फीचर दिले जात आहे. मात्र, वाढते रस्ते अपघात पाहता, सरकारने सर्वच प्रकारच्या वाहनांमध्ये हे तंत्रज्ञान अनिवार्य करण्याची गरज आहे. जोपर्यंत हे तंत्रज्ञान सर्व गाड्यांमध्ये येत नाही, तोपर्यंत प्रत्येक वाहनचालकाने स्वतःहून जबाबदारी ओळखून समोरून वाहन येत असताना आपली हेडलाईट ‘लो-बीम’वर ठेवण्याची सवय लावली पाहिजे. आपली एक छोटीशी खबरदारी कोणाचा तरी मौल्यवान जीव वाचवू शकते,हे लक्षात ठेवायला हवे.






