Honda ने लाँच केली नवीन NX500 बाईक; एक्स-शोरूम किंमत पोहोचली 7.44 लाखांवर
नवी दिल्ली : सध्या अनेक नवनव्या बाईक्स लाँच केल्या जात आहेत. त्यात आता जपानी दुचाकी निर्माता कंपनी होंडाने भारतात आपली नवीन ॲडव्हेंचर बाईक होंडा NX500 ई-क्लच लाँच केली आहे. ही बाईक विशेषतः अशा रायडर्ससाठी डिझाइन केली आहे, ज्यांना लांब पल्ल्याचा प्रवास, ॲडव्हेंचर रायडिंग आणि शहरात आरामदायी प्रवास करायला आवडतो.
नवीन NX500 चे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे तिची नवीन ई-क्लच सिस्टीम, जी रायडिंगला पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि आधुनिक बनवते. नवीन होंडा NX500 ई-क्लचमध्ये ४७१ सीसी, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन अंदाजे ४७ बीएचपी आणि ४३ एनएम टॉर्क निर्माण करते. कंपनीने यात ६-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. बाईकचे इंजिन त्याच्या सुरळीत आणि शक्तिशाली कामगिरीसाठी ओळखले जाते, ज्यामुळे महामार्गावर आणि शहरात दोन्ही ठिकाणी एक उत्तम अनुभव मिळतो. कंपनीने या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 7.44 लाख ठेवली आहे.
या बाईकचे सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान म्हणजे तिची होंडा ई-क्लच सिस्टीम. या फीचर्समुळे रायडरला क्लच न दाबताच गिअर बदलता येतो. यामुळे ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच वापरण्याची गरज कमी होते. मात्र, रायडरची इच्छा असल्यास, ते नेहमीच्या बाईकप्रमाणे मॅन्युअली क्लचचा वापर देखील करू शकतात. ही सिस्टीम विशेषतः नवीन रायडर्स आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी उपयुक्त मानली जाते.
बाईकचे डिझाइन नेमके आहे कसे?
डिझाइनच्या बाबतीत, नवीन NX500 एक प्रीमियम ॲडव्हेंचर टूरर बाईक असल्याचे दिसते. यात उंच विंडस्क्रीन, दणकट फ्युएल टँक, एलईडी हेडलाइट्स आणि ॲडव्हेंचर-स्टाईल बॉडी आहे. बाईकचा लूक स्पोर्टी आणि आधुनिक आहे, ज्यामुळे ती रस्त्यावर शक्तिशाली दिसते. होंडाने ही बाईक शहरातील रस्त्यांवर तसेच हलक्या ऑफ-रोड भूभागावर आरामदायक असेल अशा प्रकारे डिझाइन केली आहे.
बाईकमध्ये 5 इंचाचा TFT डिस्प्ले
यात ५-इंचाचा TFT डिस्प्ले आहे जो होंडा रोडसिंक कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. याचा अर्थ असा की रायडर आपला स्मार्टफोन बाईकला कनेक्ट करू शकतो आणि कॉल्स, मेसेजेस आणि नेव्हिगेशन यांसारख्या वैशिष्ट्यांचा वापर करू शकतो. याव्यतिरिक्त, या बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल डिस्क ब्रेक्स, एबीएस आणि शोवा यूएसडी फ्रंट फोर्क्स यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देखील आहेत.






