फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे नेहमीच परदेशातील ऑटो कंपन्यांसाठी एक मोठे मार्केट ठरले आहे. म्हणूनच तर भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या ऑटो कंपन्या बेस्ट फीचर्स असणाऱ्या कार लाँच करत असतात. अनेक कंपन्यांना भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमुळे सुगीचे दिवस आले आहेत. पण याच भारतीय मार्केटमध्ये एका कंपनीच्या विक्रीत 12 वर्षातील सर्वात मोठी घट दिसून आली आहे.
एकेकाळी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार कंपनी Hyundai ला आज कमी विक्रीचा सामना करावा लागत आहे. एकेकाळी भारतीय मार्केटवर राज्य करणाऱ्या या कंपनीचा मार्केट शेअर आता 12 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर पोहोचली आहे. मारुती सुझुकीच्या नंतर सर्वात मजबूत कंपनी म्हणून ह्युंदाई कडे पहिले जाते.
अलिकडेच, FADA (फेडरेशन ऑफ ऑटोमोटिव्ह डीलर्स असोसिएशन) चा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की एप्रिल 2025 मध्ये ह्युंदाईचा मार्केट शेअर 12.47% पर्यंत घसरला होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हा आकडा 14.29% होता. आता, ह्युंदाई मारुती सुझुकी, महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या मागे चौथ्या क्रमांकावर आहे.
आज ह्युंदाई एसयूव्हीकडे अधिक लक्ष देत आहे. कंपनी विशेषतः क्रेटावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. एप्रिल 2025 मध्येच, ह्युंदाईच्या एकूण विक्रीपैकी 38% विक्री एकट्या क्रेटाकडून झाली. परंतु, ग्रँड आय10 निओस, ऑरा, व्हेन्यू, एक्सटर, आय20 सारख्या इतर कारच्या विक्रीत घट झाली.
भारतीय मार्केटमध्ये10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कार सर्वाधिक विकल्या जातात, परंतु ह्युंदाईने या सेगमेंटकडे दुर्लक्ष केलेले दिसते, तर महिंद्रा आणि टाटा यांनी या सेगमेंटमध्ये आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे.
एकेकाळी प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्वोत्तम असलेली ह्युंदाईची i20 आता फीचर्समध्ये कपात केल्यामुळे खरेदीदारांना निराश करत आहे. 2025 च्या अपडेटमध्ये कूल्ड ग्लोव्हबॉक्स, पुडल लॅम्प आणि डोअर ट्विटर कव्हर्स सारखी फीचर्स काढून टाकण्यात आले आहेत. दरम्यान, मारुतीची बलेनो अजूनही 1 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री करत आहे.
किया, टोयोटा, एमजी मोटर सारख्या कंपन्याही ह्युंदाईला मागे टाकण्यासाठी पूर्णपणे तयार होत आहेत. कियाच्या विक्रीत 18.3% वाढ झाली आहे आणि त्यांच्या नवीन एसयूव्ही क्लॅव्हिस आणि सायरोस लवकरच बाजारात येणार आहेत.
एप्रिलमध्ये ह्युंदाईने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 654 टक्क्यांची वाढ दर्शविली असली तरी, ही संख्या फक्त 686 युनिट्स इतकी होती. त्याच वेळी, टाटा, एमजी आणि महिंद्रा यांनी या सेगमेंटमध्ये दमदार इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहे.