Kinetic Green ने त्यांची नवीन इलेक्ट्रिक दुचाकी E Luna Prime लाँच केली
कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड या भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी उत्पादक कंपनीने आज ई-लुना प्राइम ही नवी इलेक्ट्रिक दुचाकी सादर केली. भारतातील प्रवासी मोटरसायकल श्रेणीसाठी डिझाइन करण्यात आलेली ही दुचाकी किफायतशीर, विश्वसनीय आणि प्रगत फीचर्सनी सज्ज आहे.
ई-लुना प्राइमचे डिझाइन खासकरून शहरी व ग्रामीण ग्राहकांसाठी करण्यात आले आहे. 16-इंच अलॉय व्हील्समुळे खडतर रस्त्यांवर स्टेबिलिटी मिळते, तर पुढील बाजूस दिलेली प्रशस्त जागा सामान वाहतुकीची गरज भागवते. ही फीचर्स पारंपरिक बाईकपेक्षा वेगळी असून, दैनंदिन वापरात ती उपयुक्त ठरतात.
डिझाइनच्या दृष्टीने ई-लुना प्राइममध्ये ब्राइट एलईडी हेडलॅम्प, आरामदायी स्पोर्टी सीट, रंगीत डिजिटल क्लस्टर, आकर्षक बॉडी डेकल्स आणि ट्यूबलेस टायर्स देण्यात आले आहेत. दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या दुचाकीची रेंज 110 किमी आणि 140 किमी आहे. किंमत 82,490 (एक्स-शोरूम) पासून सुरू होत असून ती सहा कलर ऑप्शन्समध्ये कंपनीच्या डीलरशिपवर उपलब्ध आहे.
नवीन GST Rates मुळे ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीची लॉटरी निघाली! ग्राहकांची शोरूममध्ये प्रचंड झुंबड
कायनेटिक ग्रीनच्या मते, भारताच्या एकूण लोकसंख्येतील जवळपास 50% म्हणजेच 75 कोटी लोकांकडे अद्याप दुचाकी नाही. ई-लुना प्राइम हा वर्ग लक्षात घेऊन विकसित करण्यात आला आहे. पेट्रोल बाईकचा मासिक मालकीहक्क खर्च अंदाजे ₹7500 असतो. त्याच्या तुलनेत ई-लुना प्राइमचा खर्च फक्त ₹2500 प्रतिमहिना आहे, म्हणजेच ग्राहकांना दरवर्षी सुमारे 60,000 ची बचत होते. प्रति किलोमीटर फक्त 10 पैसे असा कार्यसंचालन खर्च ही तिची आणखी एक महत्त्वाची जमेची बाजू आहे.
लाँचप्रसंगी कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, “आम्हाला ई-लुना प्राइम लाँच करताना अभिमान वाटतो. ही दुचाकी भारतातील प्रवासी बाईक श्रेणीसाठी किफायतशीर, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण सोल्यूशन आहे. ई-लुना सिरीजच्या यशाला पुढे नेत, प्राइममुळे आम्ही ग्राहकांच्या अपूर्ण गरजांना उत्तरे देत आहोत. आमचा विश्वास आहे की ही दुचाकी भारताच्या गतिशीलतेच्या भविष्यात महत्वाचा टप्पा ठरेल.”
ई-लुना प्राइम केवळ वैयक्तिक प्रवासापुरती मर्यादित नाही तर ती व्यवसायिक वापर, मालवाहतूक आणि उपयुक्तता सेवांसाठीही आदर्श ठरते. त्यामुळे ती ग्रामीण भागातील तसेच लघुउद्योजकांच्या गरजा पूर्ण करण्यात सक्षम आहे.
सध्या कायनेटिक ग्रीनकडे देशभरात ३०० हून अधिक डीलरशिपचे जाळे आहे. कंपनीने याआधी लाँच केलेल्या ई-लुनाने बाजारपेठेत मोठे यश मिळवले असून, प्राइमच्या आगमनामुळे हा वारसा आणखी बळकट होणार आहे.