फ्रान्सची प्रसिद्ध टायर उत्पादक कंपनी ‘मिश्लिन’ने भारतीय बाजारपेठेत आपला पहिला स्थानिक पातळीवर उत्पादित केलेला पॅसेंजर कार टायर ‘Primacy 5’ अधिकृतपणे लाँच केला आहे. या टायरची सुरुवातीची किंमत ₹१०,००० ठेवण्यात आली असून, तो १६ ते २२ इंच आकाराच्या रिम साईझमध्ये उपलब्ध असेल. मिश्लिन गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून भारतात ट्रक आणि बससाठी टायर्सची निर्मिती करत आहे, मात्र पॅसेंजर गाड्यांच्या सेगमेंटमध्ये भारतात निर्मिती करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ही केवळ सुरुवात असून आगामी काळात ‘Pilot Sport 4 SUV’, ‘Pilot Sport 5’ आणि ‘LTX Trail ST’ हे टायर्स देखील टप्प्याटप्प्याने भारतातच तयार केले जातील.
बंपर सूट! टाटा कार्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी! ऑगस्ट महिन्यात १.२५ लाखांपर्यंतची सूट
Michelin Primacy 5 ची मुख्य वैशिष्ट्ये
उत्कृष्ट ब्रेकिंग क्षमता: इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या टायर्सच्या तुलनेत हा नवीन टायर ओल्या रस्त्यावर ८ मीटर आधी गाडी थांबवतो. तर जुना झाल्यावरही ९ मीटर कमी अंतरात गाडी थांबवण्याची क्षमता ठेवतो. तसेच कोरड्या रस्त्यावर इतर टायर्सपेक्षा ४ मीटर कमी अंतरात ब्रेक लागतो.
अधिक मायलेज आणि रेंज: कंपनीच्या जुन्या Primacy 4ST मॉडेलच्या तुलनेत हा टायर ६.५ टक्के अधिक इंधन बचत करतो, तर इलेक्ट्रिक वाहनांची रेंज वाढवण्यास मदत करतो.
दीर्घ आयुष्य आणि अनेक गाड्यांसाठी सुयोग्य: जुन्या मॉडेलपेक्षा याचे आयुष्य ८ टक्क्यांनी जास्त असून, प्रवास अधिक आरामदायक बनवतो. १६ ते २२ इंच साईझमध्ये उपलब्ध असल्यामुळे हा टायर सामान्य मास-मार्केट गाड्यांपासून ते प्रीमियम लक्झरी वाहनांपर्यंत सर्वांसाठी योग्य आहे.
Tata Punch: टाटा पंचची सुसाट घोडदौड! ५ वर्षांपेक्षा कमी काळात विकल्या ८ लाख गाड्या; रचला नवा विक्रम
भारतीय बाजारासाठी विशेष रचना
चेन्नई येथे झालेल्या लाँचिंग सोहळ्यात बोलताना मिश्लिन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू देशपांडे म्हणाले, “भारतात तयार झालेला Primacy 5 हा भारतीय चालकांच्या गरजेनुसार विशेष विकसित आणि चाचणी केलेला आहे. स्वतंत्र चाचणी संस्थेद्वारे प्रमाणित केलेला हा टायर कंपनीच्या भारतीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे.”
मिश्लिन कंपनी आता केवळ Tier-1 शहरांपुरती मर्यादित न राहता लहान शहरांमध्येही आपला विस्तार करत आहे. गेल्या एका वर्षात कंपनीने भारतात ८०० हून अधिक विक्री केंद्रे तयार केली आहेत. येत्या दशकात भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रचंड वाढीची शक्यता असल्याने कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. हे टायर आता देशभरातील मिश्लिनच्या अधिकृत डीलर्स आणि सर्व्हिस स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.






