फोटो सौजन्य: iStock
कार खरेदी करण्यापूर्वी भारतातील अनेकजण या विचारात पडतात की त्यांनी एसयूव्ही घ्यावी की सेडान? जरी एसयूव्हींची लोकप्रियता देशात झपाट्याने वाढत असली, तरी सेडान कार्स अजूनही त्यांच्या स्टाइल, आरामदायी प्रवास आणि उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहेत. हे लक्षात घेऊन, आज आपण एसयूव्ही आणि सेडान यामधील मुख्य फरक जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या गरजेनुसार कोणती कार अधिक योग्य ठरेल हे ठरवायला तुम्हाला मदत होईल.
एसयूव्ही: एसयूव्हीमध्ये उंच बॉडी असते आणि तिचा ग्राउंड क्लीयरन्स साधारणपणे 180 मिमी ते 220 मिमी दरम्यान असतो. यामुळे खराब रस्ते, खड्डे किंवा स्पीड ब्रेकरवर ती सहज चालवता येते. बहुतांश एसयूव्ही या बॉडी-ऑन-फ्रेम चेसिसवर आधारित असतात, जे त्यांना अधिक मजबूत बनवतात आणि ऑफ-रोडिंगसाठी आदर्श ठरतात.
सेडान: सेडान कार्सना एसयूव्हीच्या तुलनेत थोडासा कमी म्हणजेच 150 मिमी ते 180 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. त्या मोनोकोक चेसिसवर आधारित असल्यामुळे त्यांचे वजन कमी असते, त्या इंधन बचत करतात आणि वेगातही अधिक स्थिर राहतात.
एसयूव्ही: एसयूव्हीमध्ये प्रामुख्याने जास्त टॉर्क निर्माण करणारी इंजिन्स वापरली जातात, ज्यामुळे हायवेवर किंवा ऑफ-रोडिंग करताना अधिक ताकद मिळते. मात्र, त्यांच्या उंच रचनेमुळे त्यांचे गुरुत्वाकर्षण केंद्र वर असते, जे हाय स्पीडवर स्थिरतेवर थोडा परिणाम करू शकते.
सेडान: सेडानमध्ये गुरुत्वाकर्षण केंद्र खाली असते आणि तिचे एरोडायनॅमिक डिझाइन असल्यामुळे ती अधिक स्थिर आणि संतुलित राहते. वळणावर ती चांगली पकड मिळवते आणि राइड क्वालिटीमध्ये एसयूव्हीच्या तुलनेत अधिक चांगली असते.
आता देशातील नंबर 1 कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उडणार झुंबड, कंपनी देतेय ‘एवढी’ भली मोठी सूट !
एसयूव्ही: एसयूव्हीचे वजन जास्त असते आणि त्यांच्या टायरांचा आकारही मोठा असतो, त्यामुळे याचे मायलेज कमी असते. त्यामुळे त्या सरासरी 13 ते 18 किमी प्रति लिटर इतकेच मायलेज देतात. याशिवाय, त्यांच्या मेंटेनन्ससाठी लागणारा खर्चही तुलनेने जास्त असतो.
सेडान: सेडानची बॉडी हलकी आणि एरोडायनामिक्स दृष्टिकोनातून डिझाइन केलेली असल्यामुळे ती 16 ते 22 किमी प्रति लिटरपर्यंत उत्तम मायलेज देते. शिवाय, त्याचे मेंटेनन्सही एसयूव्हीच्या तुलनेत खूप कमी खर्चिक आणि सुलभ असते.
जर तुम्ही अशा कारच्या शोधात असाल जी सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सहजतेने चालवली जाऊ शकेल आणि ज्यात चांगली स्पेस असेल तर एसयूव्ही तुमच्यासाठी योग्य ऑप्शन ठरू शकते. त्याच वेळी, जर तुम्हाला अशी कार हवी असेल जी चालवायला मज्जा येईल, चांगले मायलेज देईल आणि शहरासाठी योग्य असेल, तर सेडान तुमच्यासाठी योग्य असेल.