फोटो सौजन्य: iStock
भारतात बाईक्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे रस्त्यांवर वर्दळ देखील वाढत आहे. काही वेळेस तर योग्य वेळी ब्रेक न लावल्याने अपघात देखील होतात. हेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या ABS असणाऱ्या फिचर बाईकमध्ये समाविष्ट करत असतात.
देशात दररोज मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये अनेक लोक जखमी होतात. रस्ते अपघात कमी करण्यासोबतच, बाईक अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपनीकडून उत्कृष्ट टेक्नॉलॉजी देखील दिली जाते. यासोबतच अनेक बाईकमध्ये ABS दिले जाते, तर काही बाइकमध्ये हे तंत्रज्ञान दिले जात नाही.चला आज आपण जाणून घेऊयात की ABS आणि Non ABS मध्ये नेमका फरक काय आणि कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये मिळते तुम्हाला सर्वात जास्त सेफ्टी मिळू शकते.
देशातील बहुतेक वाहनांमध्ये आता ABS दिले जाते. पण तरीही काही वाहनांमध्ये अशी टेक्नॉलजी नसते. ज्या वाहनांमध्ये अशा टेक्नॉलॉजीचा वापर केला जात नाही, त्यांना नॉन-एबीएस ब्रेकिंग दिले जाते. या दोघांमधील मुख्य फरक असा आहे की ABS असलेली वाहने ABS नसलेल्या वाहनांपेक्षा अधिक आणि चांगले नियंत्रण देतात. कोणत्याही हवामानात अचानक ब्रेक लावल्यास धोका वाढतो, परंतु ABS असलेल्या वाहनांमध्ये हा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
ABS नसलेल्या वाहनांच्या तुलनेत ABS असलेली वाहने जोरात ब्रेक लावून थांबल्यावर घसरत नाहीत. ABS असलेल्या वाहनात, चालकाचे पूर्ण नियंत्रण असते. यासोबतच, जोरात ब्रेक लावले तरी व्हील्स पूर्णपणे लॉक होत नाहीत. यामुळे दिशा न बदलता वाहन सहजपणे थांबते.
वाहनांमध्ये ABS टेक्नॉलजी काम करण्यासाठी, अनेक पार्टस एकत्र काम करणे आवश्यक आहे. ABS वाहनांमध्ये, स्पीड सेन्सर्स, ECU आणि हायड्रॉलिक कंट्रोल युनिट एकत्र काम करतात आणि वाहने सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. एकदा ब्रेक लावला की, माहिती खूप कमी वेळात ECU कडे जाते. तिथून कोणत्या व्हीलला किती लवकर ब्रेक लावायचे हे ठरवले जाते. त्यानंतर ब्रेक लावले जातात. हे इतक्या कमी वेळात घडते की तुम्हाला काही कळतही नाही आणि तुम्ही सुरक्षित राहता.
ABS नसलेल्या वाहनांमध्ये, तुम्ही जितके जोरात ब्रेक दाबाल तितक्या वेगाने वाहन थांबते, ज्यामुळे कधीकधी वाहनावरील नियंत्रण सुटते किंवा ते घसरते. परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढते.