महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विधानसभेतील आमचे जुने सहकारी आणि परममित्र एकनाथ शिंदे यांचा आज जन्मदिवस आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचा उत्साह, त्यांचे शारीरिक आणि मानसिक शक्ति 30 वर्षाच्या तरूणाला देखील मागे टाकू शकते.
राज्यातील जनता प्रश्न विचारत असतात मुख्यमंत्री नेमकं झोपतात कधी? हाच प्रश्न आमच्या मनात देखील येतो. आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या दरम्यान मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी लाईट नेहमी बंद असायची. पण आता इथं 24 तास लाईट सुरुच असते. नाटककार विजय तेंडुलकर यांचे एक नाटक आहे, त्याचं नाव ‘यह सब कहाँ से आता है?’ त्यामुळे आता माझ्याही मनात प्रश्न येतो की अखेर एवढी ऊर्जा व आत्मशक्ती नेमकी येते तरी कुठून? आम्ही आमच्या स्तरावर याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे समजले की, एकनाथ संभाजी शिंदे व्यक्तिमत्त्वात त्यांच्या दोन नेत्यांवरील श्रद्धेचा परिणाम आहे. त्या श्रद्धेच्या जोरावर त्यांनी इथपर्यंत प्रवास केला आहे.
सातारा जिल्ह्यातील दरे गावातील मूळ रहिवासी असलेल्या एकनाथ राव यांचे वडील संभाजी शिंदे कामानिमित्त मुंबईला आले होते. संभाजी शिंदे यांना ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील खोका कंपनीत नोकरी मिळाली होती. त्यांना चार मुले आहेत. ज्यामध्ये सर्वात मोठे एकनाथ शिंदे हे आहेत. घरात आर्थिक अडचण, महापालिकेच्या शाळेत शिक्षण त्यांनी घेतले. त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची उमेदही होती.
मी एकनाथ शिंदे यांना 2004 पासून सभागृहात सहकारी म्हणून पाहत आहे, ओळखत आहे. मंत्रिपद आणि मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जराही अहंकार पाहिला मिळत नाही. एकनाथ शिंदे यांच्याबाबत मी एक गोष्ट अनुभवली ती म्हणजे त्यांचा शांत स्वभाव आणि कोणाच्याही आनंदात स्वत:चा आनंद मानण्याची क्षमता आहे. जर कोणताही आमदार (माझ्यासह) त्यांच्याजवळ काम घेऊन जातो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्वागतार्ह असे भाव असतात. जरी ते थकलेले असले तरीदेखील त्यांचा थकवा कधीही बोलताना जाणवला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंदच जाणवतो.
– सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते