बाबरी पडली तेव्हा तिथे कोण शिवसैनिक होते ? बाळासाहेब ठाकरेंनी तिथे आपले चार शिलेदार तरी पाठवले होते का ? आणि आता जे बडबड करत आहेत (म्हणजे उद्धव ठाकरे व संजय राऊत) हे बाबरी पडली तेव्हा कुठे होते?’ असे खोचक सवाल जाहीरपणे टीव्ही कार्यक्रमात विचारल्यामुळे चंद्रकांतदादा पाटील सध्या अडचणीत आले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नेते अशी चंद्रकांत दादा पाटील यंची ओळख आहे. ते २०१४ च्या आधी चार वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. पण त्यांचा वेगळा, विशेष असा ठसा राजकारणात उमटला नव्हता. त्यामुळेच जेव्हा २०१४ मध्ये भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले तेव्हा अचानक सहकारासारखे महत्वाचे खाते चंद्रकांतदादा पाटील यांना मिळाल्यामुळे लोकांना मोठे आश्चर्य वाटले होते. पण दादा हे संघटनेतील ‘दादा’ आहेत याची कल्पना भाजप आणि संघ परिवारात होतीच.
अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांशीही घनिष्ठ संबंध असणाऱ्या दादांचे महत्व पक्षात वेगाने वाढताना दिसले. अनेक महत्वाच्या खात्यांसमवेत त्यांनी सलग सहा वर्षे पक्षाचे प्रांताध्यक्षपद सांभाळले आणि २०१९ ची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात लढवली गेली. पण दादांचे हे महत्व अलिकडे थोडे घटू लागल्याची जाणीव जुलै २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले तेव्हापासून येऊ लागली. त्यांना ग्रामविकास वा सहकार वा वित्तसारखे महत्वाचे खाते मिळाले नाही. त्याऐवजी उच्च व तंत्रशिक्षण हे खाते दादा सांभाळत आहेत.
सरकार स्थापन होत असतानाही, ‘छातीवर दगड ठेवून आम्ही देवेंद्रजी मुख्यमंत्री नाहीत हे स्वीकारले’ अशासारखी, शिंदेंचे महत्व कमी लेखणारी, विधाने दादांनी पक्षाच्या बैठकीत केल्यामुळे वादळ उठले होते. तेव्हा त्यांना दिल्लीतून थोडी समज देण्यात आली असेही सांगितले जात होते आणि परवाच्या बाबरी वादात तर अमित शहांनी थेट मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना बोलावून माहिती घेतली आणि नंतर शेलारांनी माध्यमांना सांगितले की, ‘दादा जे बोलले, ते नसते बोलले तर बरे झाले असते!’ अशी जाहीर समज त्यांना प्रथमच मिळाली असावी.
वृत्त वाहिनीवरील दादांच्या त्या मुलाखतीनंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून तोफा डागल्याने भाजपात गडबड उडाली. शिंदेही चपापले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दादांच्या विधानाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या अतिवरिष्ठांकडे आक्षेप नोंदवला आणि नंतर शिंदेंनीच फोन करून चंद्रकांत पाटलांना सांगितले की तुमच्या विधानाचा खुलासा करा. तेव्हा दादांनी पुण्यात पत्रकारांना बोलावून आपण काय बोललो व का बोललो हे सांगितले. या साऱ्या घटनाक्रमात नेमके काय झाले ? व काय चुकले ? साध्य काय करायचे होते ? ते साधले का ? असे प्रश्न सहाजिकच पडतात.
अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयाने यशस्वीरीत्या सोडवल्यानंतर आता तिथे जागतिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, भारतीय संस्कृतीचे प्रतीक ठरावे असे भव्य दिव्य राम मंदिर उभे करण्याचे काम जोरात सुरु झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाच्या हिंदुत्वाला जगोजागी व मुद्यामुद्यावर आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत जाऊन मंदिर उभारणीची पाहणी, राम लल्लांचे दर्शन आणि शरयु नदीची आरती असे सारे साग्रसंगित पार पाडले. त्याच सायंकाळी पुण्यातून भाजपचे मंत्री व माजी प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा पडलेल्या बाबरीचा नवा वाद सुरु केला.
१९९२ सालच्या बाबरी मशीद कोसळण्याच्या विस्फोटक घटने वेळी कारसेवक म्हणून देशभरातून लाखो, तर महाराष्ट्रातूनही हजारो तरूण अयोध्येला गेले होते. राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील हे तिथे संघाच्या आदेशानुसार उपस्थित होते. ढांचा पाडायला गेलेल्यांमध्ये शिवसेना नव्हती, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याने मोठे वादळ उभे करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे हे करत आहेत असे दिसते. पण हे वादळ चहाच्या पेल्यातील ठरण्याची शक्यता अधिक आहे. बाबरी कोसळण्यासंदर्भात तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं होते की, होय याची जबाबदारी मी घेतो. या विधानाला आता तीस वर्षांनंतर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.
‘जबाबदारी घेतो म्हणजे काय ? बाळासाहेब तिथे गेले होते ? का शिवसेना तिथे गेली होती ? का बजरंग दल तिथे गेला होता ?’, असे सवाल पाटील यांनी झी २४ तास वृत्त वाहिनीचे संपादक नीलेश खरे यांना ब्लॅक अँड व्हाईट या विशेष मुलाखत देताना उपस्थित केले. अयोध्येला गेलेले कारसेवक हे कोणाही पक्षाचे अगदी भाजपचे कार्यकर्ते म्हणून तिथे गेले नव्हते असे पाटील यांना म्हणायचे असेल तर ते खरेच आहे. पण त्यात त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेतल्याने ते आता अडचणीत येत आहेत. कारण, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणे, याच एका मुद्द्यावर शिंदेंचे बंड आधारलेले आहे.
बाबरी संदर्भात साहेबांचा विचार भाजप नेतेच चुकीचा ठरवत असतील, तर त्याचा लाभ उद्धव ठाकरेंनाच होणार हे उघड आहे. उद्धव ठाकरेंना आव्हान देऊन शिवसेनेचे चालीस आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडले व भाजापने पुढाकार तर घेतलाच, पण कमीपणा, पडती बाजू घेऊनही सरकार स्थापन झाले. त्यातच दादा सध्या मंत्री आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे तेव्हाचे विधान चुकीचे होते असे जर भाजपच्या एका मोठ्या नेत्याला आता म्हणायचे असेल तरे शिंदेंसाठी ते मोठेच अडचणीचे ठरणार यात शंका नाही.
नेमका तोच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरेंनी आक्रमक सूर लावला आहे. चंद्रकांत दादांचे म्हणणे त्यात असे दिसते की ‘मला महिनाभर तिथं नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, आता विधान परिषदेत असलेले हरेंद्र धुमाळ आणि मी असे तीन राष्ट्रीय सरचिटणीस होतो (अभाविपचे), नियोजनासाठी आमच्या तिघांची तिथे उपस्थिती होती.
आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की, काहीही होवो, ढाचा पडो ना पडो, पण शेवटचा माणूस बाहेर पडल्यानंतरच तुम्ही तेथून बाहेर यायचं. त्यामुळे, जेव्हा आम्ही तेथून बाहेर पडलो तेव्हा रस्त्यावर कुत्री भुंकत होती, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी सांगितली आहे. तसेच, अशा वातावरणात काम केलेले आम्ही, मग स्वर्गीय बाळासाहेबांनी म्हटलं की ही जबाबदारी मी घेतो, पण तुम्ही काय तिथे तुमचे ४ सरदार पाठवून दिले होते का?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी त्या मुलाखतीत उपस्थित केला.
६ डिसेंबर १९९२ च्या त्या नाट्यपूर्ण दुपारी एकीकडे राम मंदिर आंदोलनात सहभागी कारसेवकांची मोठी सभा शरयुतिरी मैदानात सुरु होती. त्याचवेळी कारसेवकांच्या काही तुकड्या ज्याला तेव्हा वादग्रस्त ढांचा असा सरकारी शब्द होता, त्या बाबरी मशिदीच्या घुमटावर चढण्यात यशस्वी झाल्या होत्या. अयोध्येतील कारसेवकांची संख्या तेव्हा दोन ते तीन लाख होती आणि पोलिसांची संख्या अगदीच तोकडी होती. तेव्हा उत्तर प्रदेशात भाजपचे नेते कल्याणसिंह हे मुख्यमंत्री होते.
त्या दिवशी दुपारी तीन घुमट एकापाठोपाठ एक कोसळले आणि देशभरात हाहाःकार माजला. हे तोडणारे भाजपचे नेते कार्यकर्ते होते की अन्य कोणी होते, असे प्रश्न विचारले जात होते. तेव्हा त्या दिवशीच्या गोंधळात भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी सांगितले की घुमटावर चढलेले भाजपचे लोक नव्हते, कदाचित ते शिवसैनिक असावेत.
या जर-तरच्या मुद्द्याला मुंबईत बाळासाहेब ठाकरेंनी लगेच प्रतिसाद देऊन टाकला होता की ‘ते जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे! बाबरी तुटल्याचा खटला उभा राहिला त्यात ठाकरे हेही भाजपच्या अनेक नेत्यांसमवेत आरोपी होते. आता चंद्रकांत पाटलांचे विधान बाळासाहेबांच्या मूळ अभिमान विधानाला छेद देणारे व म्हणूनच साहेबांचा अपमान करणारे आहे असा दावा करीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना तसेच त्यांच्या चाळीस आमदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे, इतकेच.
असे वाद उकरून काढण्यामागे काही तरी नवे समझोता सुरु करण्याचा प्रयत्न असू शकतो अथवा अशा पद्धतीच्या एखाद्या विधानाचे नेमके काय राजकीय तरंग उमटतात हे जाणून घ्यायचा, चाचपणी कऱण्याचा तो प्रकार असू शकतो. पक्षश्रेष्ठींच्या थेट संपर्कात सतत असणाऱ्या चंद्रकांतदादा पाटलांनी केलेले हे वधान मुलाखतीच्या ओघात सहज आलेले आहे की ते मुद्दाम काही हेतुसाठी करण्यात आले आहे ? विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे !!
अनिकेत जोशी
aniketsjoshi@hotmail.com