फोटो सौजन्य - Social Media
अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड काउन्सिल ऑफ इंडिया (ASCI) च्या वार्षिक तक्रार अहवाल २०२५-२६ मध्ये जाहिरात क्षेत्रातील नियमभंगात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षी एकूण तक्रारींमध्ये २१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, विदेशी सट्टेबाजी (ऑफशोर बेटिंग) आणि रिअल इस्टेट ही सर्वाधिक उल्लंघन करणारी क्षेत्रे ठरली आहेत.
अहवालानुसार, जाहिरात नियमांचे सर्वाधिक उल्लंघन करणाऱ्या क्षेत्रांमध्ये विदेशी सट्टेबाजी, रिअल इस्टेट, पर्सनल केअर उत्पादने, खाद्य व पेये आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट (DMRA) अंतर्गत येणारी उत्पादने यांचा समावेश आहे. एकूण तपासलेल्या जाहिरातींपैकी ७५.४ टक्के जाहिरातींनी हानिकारक उत्पादनांना किंवा परिस्थितींना प्रोत्साहन दिले, तर २७.५ टक्के जाहिराती दिशाभूल करणाऱ्या होत्या. डिजिटल प्लॅटफॉर्मवरच ९७.३ टक्के प्रकरणे आढळली असून, सोशल मीडियावरील प्रायोजित कंटेंटचा मोठा वाटा आहे.
२०२५-२६ मध्ये ASCI ने एकूण ११,५८१ प्रकरणांचा आढावा घेतला, जे मागील वर्षाच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे. संबंधित जाहिरातींची संख्या ९,८४१ इतकी होती, ज्यामध्ये ३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. यातील ९८ टक्के जाहिरातींमध्ये बदल आवश्यक ठरला, तर ९३ टक्के प्रकरणे स्वतःहून केलेल्या निरीक्षणातून (proactive monitoring) समोर आली.
विशेष म्हणजे, ८६ टक्के जाहिरातदारांनी नियमांचे पालन केल्याचे दिसून आले. टीव्ही आणि प्रिंट माध्यमांमध्ये हे प्रमाण ९७ टक्के होते. ६१ टक्के प्रकरणांमध्ये कोणताही वाद न करता जाहिराती मागे घेण्यात आल्या किंवा सुधारण्यात आल्या. डिजिटल क्षेत्रात नियमभंग अधिक गंभीर स्वरूपात दिसून आला आहे. एकट्या मेटा प्लॅटफॉर्म्सचा वाटा ७९.८४ टक्के इतका असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. इन्फ्लुएन्सर जाहिरातींमध्येही मोठ्या प्रमाणावर नियमभंग आढळला असून, तपासलेल्या बहुतेक केसेसमध्ये बदल आवश्यक होते.
विदेशी सट्टेबाजीच्या जाहिराती सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर्स, अॅफिलिएट नेटवर्क्स आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सद्वारे वेगाने पसरवल्या जात असल्याचेही अहवालात स्पष्ट केले आहे. या क्षेत्रात इन्फ्लुएन्सर्सकडून मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे नमूद आहे. पर्सनल केअर आणि खाद्य-पेय क्षेत्रात अतिशयोक्तीपूर्ण तसेच वैज्ञानिक आधार नसलेले दावे आढळले. तर न्युट्रास्युटिकल्स उत्पादनांमध्ये वैद्यकीय स्वरूपाचे आणि दिशाभूल करणारे दावे मोठ्या प्रमाणात दिसून आले.
ASCI चे अध्यक्ष आणि सीईओ यांनी डिजिटल जाहिरात क्षेत्रात अधिक जबाबदारी, मजबूत पुरावे आणि प्रभावी नियंत्रण यंत्रणांची गरज अधोरेखित केली आहे. अहवालानुसार, डिजिटल जाहिरात क्षेत्राचा वेग, पोहोच आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंगमुळे नियमभंगाचा धोका वाढत आहे, त्यामुळे भविष्यात अधिक कडक देखरेख आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.






