Retail Inflation in October 2025 (photo-social media)
Retail Inflation in October 2025 : 2025 मधील ऑक्टोबर महिन्याचा किरकोळ महागाईची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ महागाई अनेक वर्षानंतर सर्वात कमी आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती घसरल्या असून तेल महागले आहे. 10 वर्षांत पहिल्यांदाच असे घडले असून यामुळे सोने आणि पर्सनल केअर वस्तु महागल्या आहेत. यामुळे मध्यम वर्गीय लोकांना दिलासा मिळाला असून ‘जीएसटी’ कमी केल्याचा परिणाम सकारात्मक दिसून आला आहे.
वस्तू आणि सेवा कराचा अभ्यास करून किरकोळ वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने त्याचा फायदा मध्यम वर्गीय लोकांना अधिक झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ चलनवाढ अर्थात रिटेल इन्फ्लेशनने ऑक्टोबर महिन्यात विक्रमी नीचांकी पातळी गाठली असून 0.25 टक्क्यांची नोंद करण्यात आली आहे. तब्बल 380 वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने आणि त्याचवेळी भाजीपाल्याचे दर उतरल्याने किरकोळ चलनवाढ खाली आला. बुधवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली.
हेही वाचा : GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?
ग्राहक किंमत निर्देशांकावर वर्ष 2012 हे आधारभूत वर्ष धरून ऑक्टोबर महिन्याची किरकोळ चलनवाढ मोजली गेली. यामध्ये सप्टेंबर महिन्याची 1.44 टक्के किरकोळ चलनवाढीची नोंद करण्यात आली होती. तर, ऑक्टोबर 2024 मध्ये किरकोळ चलनवाढ तब्बल 6.21 टक्के नोंदवण्यात आली होती. तेल, भाजीपाला, पादत्राणे, फळे असा अनेक उत्पादनेसह वाहतूक व दूरसंचार सेवांचेही दरात घसरण झाल्याने ऑक्टोबर महिन्यातील चलनवाढीत घट झाली. तसेच, 22 सप्टेंबरपासून केंद्र सरकारने जीएसटी मध्ये बदल केल्याने त्याचाही फायदा झाला. यासंबधित माहिती काढताना केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने देशातील 1,181 गावांसह 1,114 शहरांचा आढावा घेऊन किरकोळ चलनवाढीची टक्केवारी काढली.
हेही वाचा : भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या जोरावर; कोणाच्याही दबावाने अडणार नाही मार्गावर
भारत देशातील काही भागात किरकोळ चलनवाढ घसरली असली तरी, काही राज्यात अजूनही परिस्थिती तशीच आहे. देशात केरळमध्ये सर्वाधिक किरकोळ चलनवाढ सुमारे 8.56 टक्के असून त्यालागोलाग किरकोळ चलनवाढ 2.95 टक्के जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू अनुक्रमे 2.34 टक्के, 1.81 टक्के, 1.29 टक्के इतकी चलनवाढ आहे. तर, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आसाम, दिल्ली आणि बिहार या राज्यात स्थिर चलनवाढ नोंदवण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक संपूर्ण चालू आर्थिक वर्षासाठी 2.6 टक्क्यांवरून चलनवाढ कमी करण्याची शक्यता असल्याचे ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे, डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणाऱ्या पतधोरण आढाव्यात चलनवाढीच्या सध्याच्या आकडेवारीमुळे रेपो दरात पाव टक्के कपात होऊ शकते. अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.






