Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार
या कराराअंतर्गत टोयोटा-किर्लोस्कर कंपनी महाराष्ट्रातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये (LMV) हलक्या वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळा उभारणार आहे. याचबरोबर या प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, या उपक्रमामुळे सुमारे ८,००० आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
करारावर टोयोटा-किर्लोस्कर मोटार कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रमजी गुलाठी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका श्रीमती माधवी सरदेशमुख यांनी स्वाक्षरी केली. पुढील ५ वर्षांत ४५ प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील १३ प्रयोगशाळा मार्च २०२६ पर्यंत सुरू होतील. उर्वरित प्रयोगशाळा तीन टप्प्यांत सुरू केल्या जातील, असे गुलाठी यांनी सांगितले.
कौशल्य विभाग आयटीआय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. उच्च दर्जाच्या प्रशिक्षणामुळे तरुणांना जागतिक रोजगार बाजारपेठेत संधी उपलब्ध होईल, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. तसेच उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने आयटीआयमधील पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून कुशल मनुष्यबळ घडविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील काळात आणखी रोजगाराभिमुख MoU केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, सहसंचालक सतीश सूर्यवंशी, टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष रमेश राव, मानव संसाधन व्यवस्थापक भास्कर पै, आणि मुख्य व्यवस्थापक रवी सोनटक्के उपस्थित होते.






