नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतने दुबईत एक आलिशान घर विकत घेतले आहे. हे घर दुबईतील आतापर्यंतचे सर्वात महागडे असून त्याची किंमत ८० दशलक्ष डॉलर आहे. हा बंगला अतिशय आलिशान असून यात सर्व प्रकारच्या लक्झरी सुविधा आहेत.
मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलासाठी घेतलेला आलिशान बंगला समुद्रकिनारी आहे. यात सर्व प्रकारच्या सुविधा असून १० बेडरूम आहेत. तसेच, पाहुण्यांसाठीही वेगळी व्यवस्था आहे. यासोबतच इनडोअर-आउटडोअर स्विमिंग पूल, जिम आणि एक सिनेमागृहही आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत हे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अनंत अंबानी हे ९३.०३ अब्ज डॉलर्सचे मालक आहेत.
शाहरुख खान आणि डेव्हिड बेकहॅम शेजारी
दुबई हे जगभर अतिश्रीमंत जीवनशैलीसाठी ओळखले जाते. दुबई सरकारकडूनही त्याचा प्रचार करण्यात येत असून दीर्घकालीन गोल्डन व्हिसा देऊन जगभरातील श्रीमंत लोकांना येथे राहण्यासाठी बोलावले आहे. अंबानींपूर्वी बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यांनीही याठिकाणी घर खरेदी केले आहे. त्यामुळे आता शाहरुख खान आणि डेव्हिड बेकहॅम हे अंबानींचे शेजारी असणार आहे.