भारतात वाढतेय वजन वाढण्याची समस्या (फोटो सौजन्य - iStock)
भारतामध्ये स्थूलतेची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अनेक जास्त वजन असलेल्या व्यक्तींना स्वतःला ठणठणीत वाटते आणि ते स्वतःला निरोगी समजतात. मात्र, शरीरातील अतिरिक्त चरबी हृदय, यकृत (लिव्हर) आणि स्वादुपिंड (पॅनक्रियास) यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करू शकते. तुम्हाला माहिती आहे का? मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, थायरॉईड असंतुलन आणि व्हिटॅमिनची कमतरता हे आजार सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणांशिवाय विकसित होऊ शकतात. डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे. म्हणूनच जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. नियमित रक्त तपासण्या केल्याने स्थूलतेमुळे निर्माण होणाऱ्या लपलेल्या समस्या ओळखता येतात आणि त्यावर वेळेवर उपचार करता येतात. महत्त्वाच्या तपासण्या ज्या दुर्लक्षित करू नयेत.
HbA1c (रक्तातील साखरेची तपासणी):
ही तपासणी मागील तीन महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेचे प्रमाण दर्शवते. जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स आणि टाइप २ मधुमेहाचा धोका जास्त असतो. HbA1c वाढलेले असल्यास लक्षणे दिसण्यापूर्वीच प्रीडायबेटीस किंवा मधुमेहाची शक्यता कळू शकते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी ही तपासणी करणे योग्य ठरते.
लिपिड प्रोफाइल:
या तपासणीत LDL (वाईट कोलेस्ट्रॉल), HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण तपासले जाते. स्थूलतेमुळे वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढतात, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.
लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT):
जास्त वजनामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. LFT द्वारे यकृताचे आरोग्य तपासता येते आणि चरबी साचल्यामुळे होणारे सुरुवातीचे नुकसान ओळखता येते.
थायरॉईड फंक्शन टेस्ट:
थायरॉईड हार्मोन्स शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रित करतात. थायरॉईड कमी कार्यरत असल्यास (हायपोथायरॉईडीझम) वजन वाढणे, थकवा आणि मेटाबॉलिझम मंदावणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे थायरॉईड तपासणी नियमितपणे करणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डी पातळी:
जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. यामुळे सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात व मानसिक ताण वाढू शकतो.
स्थूलतेकडे दुर्लक्ष करू नका वेळीच योग्य पावले उचला. नियमित तपासण्यांसोबतच ताज्या फळे आणि भाज्यांनी समृद्ध पौष्टिक आहार घ्या, गरज असल्यास व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या, पुरेशी झोप घ्या आणि दररोज व्यायाम करा. वजन कमी करण्यासाठी आणि स्थूलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे.वेळेवर तपासणी, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे मोठे आजार टाळता येतात. आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्याची काळजी घ्या.






