(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मर्यादित वाढ होत असताना, भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही चढ-उतार दिसून आला. BSE Sensex १७७ अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर पहिल्या १० कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण ७४,१११.५७ कोटी रुपयांची वाढ झाली. या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली तर भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांसारख्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झाली.
या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ₹24,696.89 कोटींनी वाढून ₹18.33 लाख कोटी झाले, ज्यामुळे ती देशातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवल ₹19,338.68 कोटींनी वाढून ₹8.38 लाख कोटी झाले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल देखील ₹14,515.93 कोटींनी वाढून ₹9.06 लाख कोटी झाले. आणखी अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आणि कोण तोट्यात राहिलं जाणून घेऊयात.
भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (LIC) बाजार भांडवल ₹९,०७६.३७ कोटींनी वाढून ₹५.१४ लाख कोटी झाले. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल ₹३,७९७.८३ कोटींनी वाढून ₹५.७० लाख कोटी झाले. लार्सन अँड टुब्रोचे बाजारमूल्य देखील ₹२,६८५.८७ कोटींनी वाढून ₹५.४० लाख कोटी झाले.
गेल्या आठवड्यात, भारती एअरटेलचे बाजार भांडवल ₹२०,२२९.६७ कोटींनी घसरून ₹११.४० लाख कोटींवर आले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल देखील ₹१६,२१२.१८ कोटींनी घसरून ₹५.१७ लाख कोटींवर आले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल ₹१२,७८४.४ कोटींनी घसरून ₹८.७६ लाख कोटींवर आले. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल देखील ₹२,०९४.३५ कोटींनी घसरल्याने, तिचे मूल्यांकन ₹११.७९ लाख कोटींवर आले.
भारतातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले अव्वल स्थान कायम राखले असून, त्याखालोखाल एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.






