(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या महिला दुग्धव्यवसाय क्षेत्रातील खऱ्या अर्थाने प्रेरक शक्ती आहेत, तरीही त्यांचा आर्थिक स्वावलंबीपणा आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारण्यासाठी त्यांना मिळणारा पाठिंबा अधिक पक्का करण्याची गरज आहे. त्यांच्या स्वतःच्या नावावर बाजारपेठा, कर्ज, बँक खाती आणि विमा यांची अधिक चांगली उपलब्धता मिळाल्यास त्यांच्या आर्थिक स्थिरतेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते. तसेच, ज्ञानातील तफावत दूर करणे, पशुपालन व्यवस्थापन, आधुनिक पशुवैद्यकीय सेवा आणि चारा व्यवस्थापन यांविषयीचे महत्त्वाचे प्रशिक्षण गरजू महिलांपर्यंत पोहोचवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
ही दीर्घकाळापासून असलेली तफावत दूर करण्यासाठी टाटा ट्रस्ट्सने टाटा डेअरी मिशन अंतर्गत डेअरी हेल्थ अँड न्यूट्रिशन इनिशिएटिव्ह इंडिया फाउंडेशन (डीएचएएनआयआय)च्या स्थापनेसाठी मुलभूत सहकार्य केले. डीएचएएनआयआय अल्पभूधारक दूध उत्पादकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतकरी मालकीच्या मिल्क प्रोड्युसर कंपनीज दृढ करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे, ज्यामध्ये विदर्भ, महाराष्ट्र येथील इंदुजा महिला एमपीसीचा समावेश आहे.
अशा उपक्रमांमुळे हजारो महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे विदर्भामधील यवतमाळ जिल्ह्यातील मुरली गावची रहिवासी असलेल्या बी.ए. पदवीधर भारती पवन निकम. भारती यांनी आपल्या दुग्धव्यवसायाची सुरुवात दिवसाला फक्त २ लिटर दुधापासून केली होती. पती, मुलगा आणि मुलगी अशा चार जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांची मोठी ओढाताण होत असे. त्या इंदुजा महिला एमपीसीमध्ये सामील झाल्या, तेव्हा त्यांनी पशुपालनाचे सुधारित व्यवस्थापन, संतुलित आहार आणि पशुवैद्यकीय सेवा यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण घेतले. योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी हळूहळू आपला दुग्धव्यवसाय विस्तारला. आज त्यांच्याकडे ४ म्हशी, १ गाय आणि ५ भाकड जनावरे आहेत, तसेच त्या दिवसाला ९ लिटर दुधाचे उत्पादन घेत आहेत. त्यांच्या उपजीविकेसाठी आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी हा एक मोठा कलाटणी देणारा क्षण ठरला. संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यापासून ते आत्मविश्वासी दुग्ध उद्योजिका बनण्यापर्यंतचा त्यांच्या या प्रवासामधून निदर्शनास येते की, महिलांची जिद्द ग्रामीण भागातील उपजीविकेचे स्वरूप बदलू शकते.
गोंधळी गावच्या अल्फिया मैतापखा पठाण या सक्षमीकरणाचे आणखी एक उदाहरण आहे. फक्त नववीपर्यंत शिक्षण झाल्यामुळे दुग्धव्यवसायाचे मर्यादित ज्ञान आणि कमी संसाधने असताना त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीला त्या दिवसाला फक्त ३ लिटर दूध संकलित करत असत. आपल्या पाच जणांच्या कुटुंबाला स्थिरता मिळवून देण्यासाठी त्या खूप कष्ट करत असत. इंदुजा महिला एमपीसीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी जनावरांचा आहार, आरोग्य आणि स्वच्छ दूध काढण्याच्या पद्धतींवरील प्रशिक्षणात उत्साहाने सहभाग घेतला. वाढत्या आत्मविश्वासासह त्यांनी आपली जनावरे वाढवली. आज त्यांच्याकडे ६ दुभत्या म्हशी, ३ भाकड म्हशी आणि १ भाकड गाय आहे. यातून त्यांनी एका शाश्वत दुग्ध व्यवसायाचा पाया रचला आहे आणि त्यांचे दूध उत्पादन आता दिवसाला १० लिटरपर्यंत पोहोचले आहे.
भारती आणि अल्फिया यांच्यासारख्या कथा ही बाब मुख्यत्वे निदर्शनास आणतात की, या बदलाचे खरे यश फक्त दुधाच्या लिटरमध्ये मोजले जात नाही, तर त्यातून निर्माण झालेल्या सक्षमीकरणाच्या ताकदीमध्ये मोजले जाते. या दोन्ही महिलांनी भागभांडवलामध्ये गुंतवणूक करून सहकारी मॉडेलप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. त्या आपल्या गावातून या व्यवसायात सातत्याने योगदान देत आहेत, त्यांनी अत्यंत साध्या सुरुवातीचे रूपांतर एका उत्पन्न देणाऱ्या उपजीविकेमध्ये केले आहे. एक संघर्ष करणारी शेतकरी महिला ते आत्मविश्वासी दुग्ध उद्योजिका हा त्यांचा प्रवास सिद्ध करतो की, महिलांच्या जिद्दीला सक्षम संस्थांची साथ मिळते, तेव्हा ग्रामीण उपजीविकेचे संपूर्ण चित्र बदलू शकते.






