संग्रहित फोटो
पुणे : वडगाव शेरीतील एका प्लॉटवर ट्रॅक्टर, डंपर व वॉटर टँकर घुसवून कम्पाऊंड गेट तोडत जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रसिद्ध बिल्डर अमित लुकंडसह ४० जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ताब्यावेळीच येथील सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आल्याचेही म्हंटले आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया यांच्यासह ३० ते ४० जणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रवींद्र हिरालाल दुगड (वय ५८, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार ७ मे रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मधील प्लॉटवर घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार दुगड हे दुगड ग्रुपच्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय करतात. वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मधील दुगड यांच्या प्लॉटवर गेल्या काही महिन्यांपासून बांधकामाचे काम सुरू आहे. त्यासाठी साईटवर सुपरवायझर आणि सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहेत. गुरुवारी (दि. ७) सायंकाळी अमित लुंकड, राज, रुपेश ढाकलिया व इतर ट्रॅक्टर, डंपर आणि वॉटर टँकर घेऊन प्लॉटवर आले. त्यांनी साईटच्या गेटची तोडफोड करून वाहने आत घुसवली, तसेच सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. हा प्रकार समजातच तक्रारदार मुलासह घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान तेव्हा आरोपींकडून ‘हा आमचा प्लॉट आहे, तुम्ही येथून निघून जा,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. दरम्यान, विमाननगर विभागाचे पोलिस येथे आल्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी अमित लुंकड यांच्या वाहनात हत्यारे असल्याचा संशय व्यक्त केला. नंतर लुंकड हे वाहनातून तेथून निघून गेले. जमिनीचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न, गेटची तोडफोड व धमकीप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड पुढील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर






