India’s Wholesale Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई थंडावली; अन्नधान्याच्या किमती ०.३२ टक्क्यांनी घसरल्या (फोटो-सोशल मीडिया)
India’s Wholesale Inflation: देशातील महागाईमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक वस्तूंचे दर कमी झाल्याने महागाईत घट झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई (-) ०.३२ टक्के होती, जी ऑक्टोबरमध्ये (-) १.२१ टक्के होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा दर २.१६ टक्के नोंदवला गेला होता. आकडेवारीनुसार, महिन्या-दर-महिना आधारावर, डाळी आणि भाज्यांसारख्या अन्नपदार्थांच्या किमती वाढल्या, ज्यामुळे घाऊक महागाईत काही सुधारणा झाली. उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२५ मध्ये चलनवाढीचा नकारात्मक स्तर प्रामुख्याने अन्नपदार्थ, खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, मूलभूत धातूंचे उत्पादन आणि वीज यांच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे होता.
हेही वाचा: India’s Exports News: नवे बाजार, नवी संधी! भारतीय निर्यातीत १९.३७% वाढ; भारतीय वस्तूंनाही मागणी
घाऊक किंमत निर्देशांक घाऊक पातळीवर वस्तूंच्या किमतींमधील सरासरी बदल मोजतो. नकारात्मक महागाई किंवा डिफ्लेशन म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक प्रमुख वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. यावरून थेट असे दिसून येते की, घाऊक बाजारात वस्तू पूर्वपेक्षा स्वस्त झाल्या. घाऊक महागाईच्या तुलनेत, नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईत थोडीशी वाढ झाली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मते, किरकोळ महागाई 0.71% होती. ऑक्टोबरमध्ये ती 0.25% होती जी 46 बेसिस पॉइंटने वाढल्याचे दिसून आले. अन्न निर्देशांकातही घट झाल्याचे दिसून आले. नोव्हेंबरमध्ये अन्न निर्देशांकाचा घाऊक महागाई दर -२.६०% होता. याचा अर्थ असा आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत घाऊक पातळीवर अन्नपदार्थ स्वस्त झाले आहेत. याचा भविष्यात किरकोळ किमतींवर परिणाम होऊ शकतो.
या घाऊक महागाई दराच्या घसरणीमुळे मात्र, शेतकाऱ्यांवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय बाजारपेठात अन्नधान्यांच्या किंमती स्वस्त झाल्या तर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटेल. ज्यामुळे शेतीसाठी लागणारी रक्कम आणि घेतलेल्या कर्जाचे व्याजदर या सगळ्यांची सारवासारव करण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. मात्र, सामान्य जनतेसाठी ही बातमी आनंददायक आहे. सध्या वाढत्या महागाईत ही घट ग्राहकांची आर्थिक बचत करेल. वर्षाच्या शेवटी मिळालेली ही आनंदवार्ता ग्राहकांना दिलासा देईल.






