शेअर बाजारातून 'हिरवळ' गायब! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं? (फोटो सौजन्य-X)
Stock Market Crash News Marathi: सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर आज (17 जानेवारी 2025) शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. इन्फोसिस आणि अॅक्सिस बँकेच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमुळे बाजार घसरणीसह उघडला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बीएसई सेन्सेक्स ७१८.०५ अंकांनी ०.९३% ने घसरून ७६,३२४.७७ वर व्यवहार करत होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० निर्देशांक १९६.२० अंकांनी या ०.८४% ने घसरून २३,११५.६० वर बंद झाला. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स जवळपास ६% घसरले. अॅक्सिस बँकेचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक घसरले तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स जवळपास ४ टक्क्यांनी वधारले. परिणामी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी दोन्ही लाल रंगात व्यवहार करत आहेत.
आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात घसरण होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले कमकुवत संकेत मिळत आहे. काल म्हणजे 16 जानेवारीला अमेरिकेचा प्रमुख निर्देशांक नॅस्डॅक कंपोझिट घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे S&P 500 आणि Dow Jones देखील कमकुवत होते. २० जानेवारीपर्यंत अमेरिकन बाजारात चढ-उतार होतील असे तज्ज्ञांचे मत आहे. या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घ्यायची आहे.
याशिवाय, परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होणारी विक्री ही देखील भारतीय बाजारपेठेसाठी चिंतेची बाब आहे. एका अहवालानुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ४,३४१.९५ कोटी रुपयांची रोख विक्री केली. २०२५ च्या एकूण १२ व्यापार सत्रांमध्ये त्यांची एकूण विक्री ४३,२५८ कोटी रुपये होती. गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीवर अधिक भर दिला आहे.
भारतीय कंपन्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करत आहेत. डिसेंबर तिमाहीतही कंपन्यांचे आर्थिक निकाल कमकुवत राहतील असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा अर्थ भारतीय बाजाराचे मूल्यांकन देखील उच्च राहील. यामुळेच गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढत आहेत. विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांनी पॅनिक सेलिंग सुरू केले आहे. यामुळे बाजार सावरू शकत नाही आणि सतत घसरत आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) केलेली खरेदी देखील परदेशी गुंतवणूकदार आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या विक्रीमुळे होणारे नुकसान भरून काढू शकत नाही.