फोटो सौजन्य- ANI
आज आपण सर्व 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. दिल्लीच्या लालकिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित केले. या भाषणामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी विकसित भारत बनवण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी येत्या 5 वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात 75 हजार जागा वाढविण्याची घोषणा त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये पुढे सांगितले की, येत्या 10 वर्षांत एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा 1 लाखाने वाढवल्या जातील.
सध्या देशातील एमबीबीएसच्या जागा
सध्या देशातील सरकारी आणि निमसरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या 106333 जागा आहेत. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 55648 तर खाजगी महाविद्यालयात 50685 जागा आहेत. सरकारने गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये या जागां वाढविल्या असून त्यामध्ये 5150 नवीन जागांची भर टाकली होती. देशामध्ये डॉक्टरांची संख्या वाढत असली तरी ती लोकसंख्येनुसार कमी पडत आहे. शहरी भागामध्ये डॉक्टरांची संख्या बरी असली तरी ग्रामीण भागांतील डॉक्टरांची संख्या आणि उपलब्धतता हा चिंतेचा विषय आहे. सरकारकडून केले जाणारे वैद्यकीय शिक्षणांच्या जागावाढीचे प्रयत्न हे सर्वसामांन्यांकरिता अत्यावश्यक आहे.
संशोधन आणि नवोपक्रमासाठी 1 लाख कोटी रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, युवकांसाठी इंटर्नशिपवर भर दिला जात आहे. जेणेकरून देशातील तरुण कुशल मनुष्यबळाच्या जागतिक रोजगार बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करू शकतील. ते पुढे म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान चांद्रयानच्या यशानंतर संस्थांमध्ये आशा निर्माण झाली आहे.आम्ही राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. अर्थसंकल्पात आम्ही संशोधन आणि इनोव्हेशनसाठी 1 लाख कोटी रुपये दिले आहेत, जेणेकरुन तरुणांच्या कल्पनांना अमलात आणत्या येतील.
तसेच तरुणांना उद्देशून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज जगाचा देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 10 वर्षांत तरुणांच्या चेतनेमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे. रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. नवीन संधी निर्माण होत आहेत. देशातील तरुणांचा आता हळूहळू पुढे जाण्याचा कोणताही हेतू नाही, देशातील तरुण झेप घेत आहेत. भारतासाठी हा सुवर्णकाळ आहे’.