सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/सोनाजी गाढवे : शिक्षणातील नवे दृष्टिकोन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी आणि ३६५ दिवस अखंड चालणाऱ्या कर्डेलवाडी शाळेवरील पीएचडी संशोधन यांसारख्या महत्त्वाच्या घडामोडींवर नेहमीच लक्ष ठेवणाऱ्या डॉ. अर्चना अडसुळे यांनी नवराष्ट्रशी विशेष संवाद साधला. आपल्या पीएचडीतील निष्कर्षांपासून ते तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संधी-आव्हाने आणि शिक्षकांच्या बदलत्या भूमिकेपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली.
१) कर्डेलवाडी जिल्हा परिषद शाळेवर पीएचडी का करावीशी वाटली?
टीव्हीवर दत्तात्रय सकट यांची मुलाखत पाहिली आणि ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेबद्दल कळाले. कर्डेलवाडीमध्ये चौथीपर्यंत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकट दांपत्य अर्थात दत्तात्रय सकट आणि बेबीनंदा सकट शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोकरी करणारे शिक्षक आणि विद्यार्थी सुट्टीची वाट पाहतात, पण जर काम आपल्याला मनापासून आवडत असेल तर सुट्टीची गरजच भासत नाही. कर्डेलवाडी शाळेत एकही सुट्टी न घेता शाळा चालते हे पाहून मला आश्चर्य वाटले. खानकामगार आणि ऊसतोड कामगारांची मुलेही या शाळेत आनंदाने शिकू लागली, कारण त्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण मिळू लागले. शनिवार-रविवार विशेष उपक्रम असायचे, ज्यामुळे शिक्षण खेळकर, आकर्षक आणि मुलांना भावणारे झाले. या उपक्रमांनी शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता मुलांचे दुसरे घर बनले. २००१ पासून सातत्याने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल केलेच, पण त्याचबरोबर मी सरांशी भेटून शाळेविषयी माहिती घेतली आणि पीएचडी करण्याचा निर्णय घेतला
२) तुम्ही कोणत्या विषयावर संशोधन केले?
मी इ.स. १९८० ते इ.स. २०२० या कालावधीत शाळेतील शालेय वातावरण, पाठ्यक्रम नियोजन व अंमलबजावणी, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन योजना, अभ्यासपूरक व अभ्यासेत्तर उपक्रमांचे नियोजन व आयोजन, विद्यार्थ्यांचे संपादन तसेच समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्य यांचा तुलनात्मक अभ्यास केला.
३) आपल्या पीएचडी संशोधनातून शिक्षण क्षेत्राला कोणते नवे दृष्टिकोन मिळाले?
मी या उपक्रमावर पीएचडी किंवा संशोधन केले त्यातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होतो, शिकण्याचा वेग वाढतो, शिक्षकांचे सक्षमीकरण होते व समाजाचा सहभाग वाढतो हे स्पष्ट झाले. या पद्धतीत पुस्तकी ज्ञानाबरोबर सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण अधिक आकर्षक करण्यात आले आहे. संशोधन शिक्षणाला नवी दिशा देणारे ठरले.
४) शिक्षकांच्या भूमिकेत कोणते बदल अपेक्षित आहेत?
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतीय शिक्षण व्यवस्थेतील कालबाह्य यंत्रणा बदलण्याचा आहे. या धोरणातील महत्त्वपूर्ण बदलांपैकी एक म्हणजे ५+३+३+४ प्रणाली या स्वरूपात शालेय शिक्षणाच्या संरचनेत सुधारणा करणे. ही नवीन प्रणाली विद्यार्थी-केंद्रित तसेच बहुविषयक शिक्षणाला चालना देऊन सर्वांगीण विकास साधण्यास मदत करेल.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा शिक्षकांवरही महत्त्वपूर्ण परिणाम होतो. या धोरणांतर्गत शिक्षकांसाठी व्यावसायिक विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच त्यांना नवीन शिक्षण पद्धती स्वीकारण्यास, वर्ग खोल्यांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यास आणि सतत अध्यापन प्रक्रियेत नवकल्पना करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
५) शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता (झपाट्याने वाढतो आहे. यातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कोणती संधी निर्माण होत आहेत?
शिक्षण प्रणाली किंवा साधने विद्यार्थ्यांच्या कामगिरीनुसार कामांची अडचण समायोजित करण्यासाठी एआयचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला दडपण न येता, पुरेसी मदत मिळते आणि ते शिक्षणात गुंतून राहतात. स्वयंचलित एआय- आधारित प्रणाली विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट्स आणि परीक्षांचे ग्रेडिंग करतात. यामुळे विद्यार्थ्यांना त्वरित अभिप्राय मिळतो आणि शिक्षकांचा मौल्यवान वेळ वाचतो. बुद्धिमान शिकवणी प्रणाली या प्रणाली वैयक्तिक शिकवणी सत्रे उपलब्ध करून देतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला जटिल विषय सोप्या आणि समजण्यास सुलभ पद्धतीने समजावून सांगता येतात.
६)कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक क्षेत्रातील एक नवे आव्हान
कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणात व्यक्तिनिष्ठ शिक्षण, माहिती प्रक्रिया व प्रशासन सुलभ करते. परंतु तंत्रज्ञानावर अति अवलंबित्वामुळे सर्जनशीलता घटते, मानवी परस्पर संवाद कमी होतो, गोपनीयतेचे धोके व नोकरी विस्थापन वाढते. तंत्रज्ञानातील दरीमुळे असमतोल व साहित्यचौर्य वाढते. म्हणून मानवी स्पर्श, नैतिक मूल्ये व सुरक्षितता राखून योग्य नियोजन केल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण अधिक परिणामकारक ठरते.