फोटो सौजन्य - Social Media
गेल्या काही वर्षांपासून देशात वाढत्या लोकसंख्येमुळे स्पर्धेत वाढ झाली आहे आणि याचा परिणाम बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणाच्या रूपात (Career News) दिसत आहे. पण या वाढत्या प्रमाणात आता कुठे पूर्णविराम दिसल्याचे चित्रण दिसून येत आहे. ते कसे? कारण देशात बेरोजगारीचा टक्का बऱ्यापैकी घसरत चालला आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत म्हणजे देशातील काही बड्या कंपन्यांमध्ये झालेली कर्मचाऱ्यांची वाढ! यंदाच्या वर्षी गेल्यावर्षीपेक्षा जास्त भरती झाल्या आहेत आणि जास्त उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. 2025 मधील पहिल्या 10 महिन्यांत भरती गेल्या वर्षापेक्षा चांगली. एचएसबीसी इंडिया पीएमआयच्या ‘जॉब्स’ घटकाचे मूल्य 52.5 वरून 53.8 वर आले आहे. (Recruitment News)
‘या’ काही कारणामुळे कंपन्यांची भरती वाढली आहे
भरती वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे मजबूत ऑर्डर पाइपलाइन, नवीन गुंतवणूक आणि सततची वाढणारी मागणी! त्याचबरोबर जीएसटी आणि आयकर कपातीमुळे शहरी मागणी वाढ, घटती महागाई आणि कमी व्याजदरांमुळे खरेदी वाढणे, अॅल्युमिनियम, जस्त, तांबे, चांदी यांसारख्या धातू क्षेत्रातील नवीन गुंतवणुका वाढणे, हरित ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात विस्तार होणे या सगळ्या बाबींमुळे देशातील बड्या कंपन्यांमध्ये रोजगार वाढला आहे. तसेच स्थानिक सोर्सिंगमुळे देशातील अनेक भागात स्थानिक रोजगाराला दिशा मिळत आहे. (Employment Level in India)
देशामध्ये भरतीचे तुफान आणणाऱ्या कंपन्यांमध्ये KEC इंटरनॅशनल, RPG ग्रुप तसेच वेदांत ग्रुपचा समावेश आहे. जानेवारीपासून ते सप्टेंबरपर्यंत KEC इंटरनॅशनलने जवळजवळ १५०० पेक्षा जास्त उमेदवारांना रोजगार दिला आहे. तर RPG ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या १३% ने वाढली आहे तर वेदांत ग्रुपमध्ये १५% ते १८% वाढ दिसून आली आहे.
आजच्या वाढत्या भरतीचा परिणाम भविष्यातील भरतीच्या प्रमाणावर होईल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भविष्यात रोजगाराचे प्रमाण आणखीन वाढेल अशी अपेक्षा सगळे मनात ठेवून आहेत. कामगार दल सहभाग दर (LFPR) सप्टेंबरमध्ये 55.3% होता आणि हा गेल्या पाच महिन्यांतील सर्वोच्च स्तर आहे. मजबूत विक्री कामगिरी व मागणी वाढीच्या अंदाजामुळे कंपन्या कर्मचारी वाढवत आहेत असे तज्ज्ञांकडून म्हंटले जात आहे. उत्पादकता कायम ठेवण्यासाठी आणि भविष्यातील वाढीसाठी कंपन्यांचे धोरणात्मक नियोजनदेखील या सगळ्या बाबींना फार कारणीभूत आहे.






