मुहूर्त बाजूला, ट्रेंडला प्राधान्य! हरवत चाललेला पारंपरिक लग्नसोहळा अन् चुकत असलेला मुहूर्त
भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्यासाठी ‘मुहूर्त’ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लग्नाचा दिवस आणि वेळ ठरवताना विशेष काळजी घेतली जाते. पण अलीकडच्या काळात मेहंदी, प्री-वेडिंग फोटोशूट, ब्रायडल मेकअप, विविध पोशाख आणि सोशल मीडियासाठी खास क्षण टिपण्यावर अधिक वेळ दिला जातो. परिणामी, ५.३० वाजता असलेला मुहूर्त अनेकदा ७-८ वाजेपर्यंत पुढे ढकलला जातो.
यामुळे संपूर्ण लग्नसोहळ्याचं वेळापत्रक विस्कळीत होतं. लग्नानंतर पुन्हा रिसेप्शनसाठी वेगळी तयारी, फोटोसेशन यासाठी तासन्तास खर्च होतो. पाहुण्यांना वाट पाहून कंटाळा येतो आणि अनेकदा ते निघून जातात. शेवटी वरात मध्यरात्रीनंतर किंवा पहाटेच्या सुमारास निघते. काही ठिकाणी तर वरात पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत पोहोचल्याची उदाहरणंही समोर आली आहेत.
पूर्वीच्या परंपरेनुसार, “सुन ही घरची लक्ष्मी” मानली जात असल्यामुळे वरात मध्यरात्रीपूर्वीच घरी यावी, असा समज होता. संध्याकाळच्या सुमुहूर्तात लक्ष्मीचं आगमन होतं, या श्रद्धेवर आधारित ही प्रथा होती. मात्र आजच्या बदलत्या जीवनशैलीत ही भावना मागे पडताना दिसते.
यासोबतच एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दाही समोर येतो. मध्यरात्री किंवा पहाटे वाजत-गाजत निघणाऱ्या वरातींमुळे परिसरातील नागरिक, जेष्ठ व्यक्ती, रुग्ण, तसेच अभ्यास करणारे विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो. आनंद साजरा करताना इतरांच्या सोयीचाही विचार होणं तितकंच आवश्यक आहे.
आनंद साजरा करताना समाजाचं भान ठेवणं हीच खरी परंपरा आहे. बदलत्या काळासोबत नवीन गोष्टी स्वीकारताना आपल्या संस्कृतीतील मूल्यं जपणंही तितकंच गरजेचं आहे. समाजहिताचा विचार करून प्रत्येकाने याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आनंदाचा हा सोहळा खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनात आनंद निर्माण करणारा ठरेल…!






