फोटो सौजन्य- सोशल मीडिया
ICAI CA Syllabus Change 2026 : चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) लवकरच सीएच्या अभ्यासक्रमात (Syllabus)बदल करण्याची शक्यता आहे. ही संस्था बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल युगाचा विचार करून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डेटा अनालिटिक्स (Data Analytics) आणि ईएसजी (ESG) यांसारख्या आधुनिक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची तयारी करत आहे.
आतापर्यंत सीएचा अभ्यासक्रम प्रामुख्याने अकांउटिंग, टॅक्सेशन, ऑडिट, लॉ आणि फायनान्स या पारंपारिक विषयांवर आधारित होता. परंतु आगामी काळात तांत्रिक कौशल्यांनाही तितकेच मह्त्व दिले जाणार आहे.
‘CRET’ चे अध्यक्ष प्रसन्ना कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकाउंटिग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. सध्या नोकरी आणि प्रॅक्टिस या दोन्ही ठिकाणी ‘AI’ हा महत्त्वाचा भाग बनला आहे. डिजिटल टूल्स आणि एआय ‘AI’ च्या ज्ञानाशिवाय भविष्यात कोणत्याही चार्टर्ड अकाउंटंटला प्रगती करणे कठीण होऊ शकते.
याच पार्श्वभूमीवर आधारित “शिक्षण आणि प्रशिक्षण पुनरावलोकन समिती” (Career Review and Training Committee – CRET) स्थापन करण्यात आली आहे. ही समिती केवळ नवीन विषय जोडण्यावर भर देणार नाही तर आर्टिकलशिप ट्रेनिंग (Articleship Training), कम्युनिकेशन स्किल (संभाषण कैशल्य) आणि मूल्यांकन पद्धतीत (Assessment System) सुधारणा करण्यावरही काम करेल.
यापूर्वी आयसीएआयने सीए फायनल परीक्षेच्या पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला होता. आता सीए फायनलची परीक्षा वर्षातून तीनवेळा आयोजित न करता केवळ दोनदाच घेतली जाणार आहे. ही परीक्षा आता दरवर्षी मे आणि नोव्हेंबर महिन्यात होईल. मात्र, सध्यातरी सीए फाउंडेशन आणि इंटरमीडिएट परीक्षेच्या पॅटर्नमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नुकतीच सीए इंटर ग्रुप-१ ची परीक्षा ५,७ आणि ९ मे रोजी झाली. तर ग्रुप-२ ची परीक्षा ११,१३ आणि १५ मे रोजी घेण्यात आली होती. तज्ञांच्या मते, एआय आणि डेटा ॲनालिटिक्ससारखे विषय सीएच्या कोर्समध्ये समाविष्ट झाले तर विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये जॉब मिळवण्यास फायदा होईल.






