फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नौसेना अग्निवीर एमआर म्युझिशियन भरती 2025 ही संगीतामध्ये प्रावीण्य असलेल्या आणि देशसेवेच्या इच्छेने प्रेरित असलेल्या तरुण-तरुणींना दिली जाणारी एक अत्यंत खास संधी आहे. भारतीय नौसेनेने संगीत विभागासाठी अग्निवीर पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2025 असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.joinindiannavy.gov.in यावर अर्ज सादर करावा.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून 50% गुणांची अट आहे. केवळ अविवाहित पुरुष व महिला उमेदवारच अर्ज करू शकतात. भरतीनंतर चार वर्षांच्या अग्निवीर सेवाकालात विवाह करण्यास परवानगी नाही, याची स्पष्ट अट आहे.
या भरतीचा विशेष भाग म्हणजे उमेदवाराकडे संगीत कौशल्य असणे अत्यावश्यक आहे. भारतीय किंवा पाश्चात्य वाद्यसंगीताचे ज्ञान आणि प्रावीण्य असणे आवश्यक आहे. कीबोर्ड, हार्मोनियम, ड्रम्स, विंड वाद्ये, स्ट्रिंग्स इत्यादी वाद्यांपैकी किमान एका वाद्यावर प्रभुत्व असावे. गाण्यात सूर, लय आणि ताल यांचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. वयोमर्यादा बाबत, उमेदवाराचा जन्म 1 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 या दरम्यान झालेला असावा. शारीरिक चाचणीत पुरुष उमेदवारांनी 1.6 किमी धाव 6.30 मिनिटांत पूर्ण करावी लागेल, तसेच 20 उठाबशा व 15 पुशअप पूर्ण करावे लागतील. महिला उमेदवारांसाठी हीच धाव 8 मिनिटांत, 15 उठाबशा व 10 पुशअप अशी असणार आहे.
या भरतीत कोणतेही अर्ज शुल्क नाही. निवड प्रक्रिया मॅट्रिकच्या गुणांवर आधारित शॉर्टलिस्टिंग, संगीत कौशल्य चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) आणि वैद्यकीय तपासणी यावर आधारित असेल. पहिल्या वर्षी पगार ₹30,000/- असून, तो दरवर्षी वाढत जाऊन चौथ्या वर्षी ₹40,000/- होईल. संगीत आणि देशभक्ती यांची सांगड घालणाऱ्या या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी वेळेत अर्ज करावा.