फोटो सौजन्य - Social Media
ना कोचिंग, ना जास्त खर्च! फक्त जिद्द आणि मेहनत! या गुणांच्या जोरावर आशना चौधरी यांनी अवघड समजली जाणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत IPS अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. आज त्या मथुरेत सहाय्यक पोलिस अधीक्षक (ASP) म्हणून कार्यरत आहेत आणि तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत.
28 ऑगस्ट 1998 रोजी उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील पिलखुवा येथे जन्मलेल्या आशनाने आपले शिक्षण सेंट जेव्हियर्स स्कूल (पिलखुवा), सेंट मेरीज स्कूल (उदयपूर) आणि दिल्ली पब्लिक स्कूल (गाझियाबाद) मधून पूर्ण केले. बारावीत त्यांनी तब्बल 96.5% गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात ऑनर्स पदवी घेतली आणि साउथ एशियन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
यूपीएससीचा प्रवास मात्र सोपा नव्हता. 2020 मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली पण यश मिळाले नाही. दुसऱ्या प्रयत्नात कामगिरी सुधारली, तरी केवळ 2.5 गुणांनी निकाल हुकला. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी आपली रणनीती बदलली आणि प्रचंड मेहनतीनंतर 2022 मध्ये ऑल इंडिया रँक 116 मिळवत यश संपादन केले. IAS ची संधी असतानाही त्यांनी IPS पदाची निवड केली, कारण त्यांना कायदा-सुव्यवस्था राखत थेट लोकसेवा करायची होती.
सोशल मीडियावरही आशना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांच्या 2.81 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, जिथे त्या आपले अनुभव आणि प्रेरणादायी विचार शेअर करतात. खासगी आयुष्यात त्यांनी 2022 मध्ये UPSC मध्ये 12 वा क्रमांक मिळवलेल्या IAS अधिकारी अभिनव सिवाच यांच्याशी विवाह केला. दोघांची ओळख ट्रेनिंग दरम्यान झाली आणि तीच ओळख पुढे आयुष्यभराच्या नात्यात रूपांतरित झाली. 26 जुलै 2025 रोजी आशना चौधरी यांनी मथुरेत ASP म्हणून कार्यभार स्वीकारला आणि स्वतःच्या जिद्दीने सिद्ध केलं. यशासाठी कोचिंग नाही, तर प्रत्येक दिनी दृढ इच्छाशक्तीच सर्वात मोठं शस्त्र आहे.