(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
TCS च्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीची एकूण कर्मचारी संख्या अंदाजे २३,४६० ने कमी होऊन सुमारे ५.८४ लाख इतकी झाली. पण मार्च तिमाहीत कर्मचारी संख्येत किंचित वाढ देखील नोंदवली गेली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही घट केवळ कर्मचारी कपातीमुळे नाही, तर सुधारित कार्यपद्धती, वाढलेली उत्पादकता आणि काही पदांमधील बदलांमुळे देखील आहे.
कंपनीने स्पष्ट केले आहे की फ्रेशर भरतीवर कोणताही परिणाम होणार नाही. गेल्या वर्षी TCS ने ४४,००० नवीन प्रशिक्षणार्थींची भरती केली होती आणि या वर्षीही कंपनी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मोठ्या संख्येने तरुणांची भरती करत आहे. यावरून हे स्पष्ट होते की TCS हे इंजीनियरिंग आणि आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रमुख रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा आहे.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, TCS आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI , कन्सल्टिंग आणि ॲडव्हायझरी यांसारख्या नवीन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी विशेष आणि प्रगत कौशल्ये असलेल्या बाह्य तज्ञांचीही नियुक्ती करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, केवळ सामान्य कौशल्यांचीच नव्हे, तर ‘भविष्यासाठी सज्ज’ असलेल्या कौशल्यांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेवेळी याचा प्रकर्षाने विचार केला जात आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, कर्मचारी संख्येत कपात होण्यामागे एआय (AI) हे कारण नाही. कंपनीला भविष्यासाठी तयार करण्याकरिता हा बदल करण्यात आला आहे. शिवाय, कंपनीने असेही म्हटले आहे की, मनुष्यबळावरील प्रत्यक्ष परिणाम हा सुरुवातीला सांगितलेल्या २% पेक्षा कमी आहे.
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये TCS च्या कमाईत किंचित घट झाली. कंपनीच्या इतिहासात प्रथमच तिच्या इनकममध्ये घट झालेली जाणवली. पण AI-शी निगडीत महसूल वेगाने वाढत असून तो आता २.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. कंपनीचा विश्वास आहे की भविष्यात AI चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल, ज्यामुळे व्यवसाय वेगळ्या टप्प्यावर पोहोचेल.
टीसीएस आता एआयच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असून नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. पायाभूत सुविधांपासून ते प्रगत बुद्धिमत्तेपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याची कंपनीची इच्छा आहे. या उद्देशाने, टीसीएसने अनेक मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी केली असून डेटा सेंटर्ससारख्या प्रकल्पांवर काम करत आहे.






