पंढरपुरात पांडुरंगाचा तुळशीहार घालून मुख्यमंत्र्यांचा अभूतपूर्व सत्कार
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरीच्या पांडुरंगाचा तुळशीहार व बैलगाडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री डॉ. अशोक उईके, भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, प्रदेश सचिव माऊली हळणवर यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी पंपधारकांना सध्या वीजबिल येत नसले तरी जुन्या थकबाकीची नोंद कायम असल्याने नवीन वीजजोडणीसह विविध सुविधांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी सरकारने ₹48 हजार कोटींची जुनी थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. “शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने इतिहास लिहिता आला पाहिजे,” या शब्दांत त्यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यातील 76 टक्के शेतकऱ्यांना सध्या दिवसा मोफत वीज उपलब्ध होत असून, या वर्षाअखेर 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
शेती अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक करण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, ड्रिप इरिगेशन, ऑनलाइन सिंचन प्रक्रिया अशा योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, दुष्काळी भागात लाखो शेततळ्यांमुळे शेतीला मोठा आधार मिळाला आहे. अल निनोमुळे अनियमित पावसाचे संकट निर्माण होत असले तरी शेततळी पिकांसाठी जीवनदायी ठरत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
भविष्यातील शेती ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामूहिक शेती व्यवस्थेवर आधारित असणार असल्याचे सांगत, पुढील दोन ते तीन वर्षांत 50 हजार शेतकरी गट उभारण्याचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले. यामुळे शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन खर्च कमी होईल, पूरक पिकांना चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्जमाफी, ₹48 हजार कोटींची वीजबिल माफी, 100 टक्के दिवसा मोफत वीज आणि आधुनिक शेतीचा रोडमॅप या घोषणांमुळे राज्यातील बळीराजासाठी सरकारने मोठी विकासात्मक दिशा निश्चित केल्याची भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.






