फोटो सौजन्य- सोशल मीडिया
राजस्थानच्या कोरड्या आणि उष्ण प्रदेशातून वाहणारी ही नदी ‘लुनी नदी’ या नावाने प्रसिद्ध आहे. ज्या प्रदेशात पाण्याची नेहमी कमतरता असते. तिथे लुनी नदी लोकांना आणि प्राण्यांना दिलासा देते. यामुळेच भारताच्या भूगोलात या नदीला विशेष स्थान आहे.
लुनी नदीचा उगम नाग पाहाडजवळ अरवलीच्या पर्वतरांगेत होतो. ही नदी अजमेरपासून पश्चिमेकडे वाहत जाऊन नंतर कमी पर्जन्य असलेल्या थर वाळवंटात प्रवेश करते. राजस्थानातील अनेक गावांचा आणि पशुपालकांचा मुख्य पाण्याचा स्त्रोत असलेल्या या नदीला खूप महत्त्वाचे मानले जाते.
लुनी नदीची एकूण लांबी अंदाजे ४९५ किलोमीटर आहे. ती राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमधून वाहत जाऊन पुढे ती गुजरातमध्ये प्रवेश करते. सुरवातीला तिचे पाणी गोड असल्याने ते पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते. परंतु नदी जसजशी पुढे जाते तसतसे तिच्यातील क्षारांचे प्रमाण वाढते ज्यामुळे ती खारी बनते, म्हणूनच स्थानिक भाषेत तिला ‘लवणवती नदी’ असेही म्हटले जाते. ज्याचा अर्थ खारट नदी असा होतो.
लुनी नदी शेवटी कच्छच्या दलदलीच्या रणात संपते. विशेष म्हणजे तिचे पाणी पूर्णपणे समुद्राला मिळत नाही. ही नदी राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांतून वाहते. या नदीचा उगम राजस्थानमध्ये होत असून शेवट गुजरात राज्यात होतो. अशी ही अद्वितीय वाळवंटी नदी शेती, पशुपालन आणि दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.






