संग्रहित फोटो
पुणे/गायत्री पवळे : कविता म्हणजे केवळ पुस्तकातील शब्द किंवा मंचावरील पारंपरिक काव्यवाचन एवढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत पुण्यात ‘स्पोकन पोइट्री’ अर्थात बोलकी कविता ही संकल्पना वेगाने लोकप्रिय होत असून, तरुणाईसाठी ती स्वतःच्या भावना, अनुभव आणि सामाजिक प्रश्न मांडण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
कॅफे संस्कृती, ओपन माईक कार्यक्रम आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे पुण्यात या नव्या काव्यप्रकाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्पोकन पोइट्रीमध्ये कवी केवळ कविता वाचत नाही, तर अभिनय, आवाजातील चढ-उतार, भावना आणि शरीरभाषेच्या माध्यमातून कविता सादर करतो. त्यामुळे श्रोत्यांशी थेट भावनिक संवाद साधला जातो. प्रेम, नातेसंबंध, मानसिक आरोग्य, स्त्रीवाद, शहरातील जीवनशैली, करिअरचा ताण, सामाजिक विषमता यांसारख्या विषयांवर तरुण कवी मुक्तपणे व्यक्त होत आहेत.
पुण्यात एफ.सी. रोड, कोरेगाव पार्क, बाणेर, कर्वेनगर या भागांतील विविध कॅफे आणि सांस्कृतिक स्थळांवर नियमित ओपन माईक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील तरुण तसेच स्वतंत्र कलाकार या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये स्पोकन पोइट्रीला प्रतिसाद मिळत आहे. मराठीतील नव्या पिढीतील कवी आधुनिक विषयांसोबतच पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीवरही कविता सादर करताना दिसतात.
राज्याबाहेरील कार्यक्रमांची संधी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे या काव्यप्रकाराला अधिक चालना मिळाली आहे. इंस्टाग्राम रील्स, युट्यूब व्हिडिओ आणि पॉडकास्टच्या माध्यमातून पुण्यातील अनेक तरुण कवी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. काही कलाकारांना राज्याबाहेरील कार्यक्रमांची संधीही मिळत आहे. स्पोकन पोइट्रीमुळे कविता अधिक लोकाभिमुख झाली आहे. पारंपरिक कविसंमेलनांपेक्षा हा प्रकार अधिक संवादात्मक आणि तरुणांना जवळचा वाटतो. त्यामुळे साहित्य आणि परफॉर्मिंग आर्ट यांचा सुंदर संगम या माध्यमातून घडताना दिसत आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात स्पोकन पोइट्रीचा वाढता प्रभाव ही केवळ कलात्मक चळवळ नसून, नव्या पिढीच्या विचारांना मिळालेला मुक्त आवाज मानला जात आहे.
कविता हाच जिवंत मनाचा उद्गार आहे आणि माणसाला नेहमीच आपल्या भावना पोहचवण्याची तीव्र इच्छा राहिली आहे. कवितेच्या माध्यमातून आपण आपल्या भावनांसहित थेट पोहचू शकतो आणि त्यातून आनंद मिळवू शकतो. त्याचवेळी समोर बसलेल्या लोकांकडून प्रतिसादही मिळू शकतो त्यामुळे स्टेजवरच्या कवितेला चांगले दिवस येताना दिसत आहेत. – विवेक वंजारी, नवोदित कवी.






