फोटो सौजन्य - Social Media
पंजाब अॅण्ड सिंध बँकेत MSME रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेने यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून एकूण ३० पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही एक उत्तम संधी असून, बँकिंग क्षेत्रातील MSME विभागात अनुभव असणाऱ्या पदवीधरांसाठी खास आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २९ मे २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर punjabandsindbank.co.in वर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करून शुल्क भरणे आवश्यक आहे. ऑफलाइन पद्धतीने कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
शुल्काची बाब विचारात घेतली तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क ₹१०० इतके आहे, तर सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹८५० शुल्क ठेवण्यात आले आहे. शुल्क भरताना जीएसटी आणि अतिरिक्त सेवा शुल्क लागेल.
या भरतीअंतर्गत रिक्त पदांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे: अनुसूचित जाती: ४, अनुसूचित जमाती: २, ओबीसी: ८, ईडब्ल्यूएस: ३ आणि अनारक्षित: १३. एकूण पदांची संख्या ३० आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवार किमान पदवीधर असावा आणि त्याचबरोबर किमान तीन वर्षांचा MSME बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा ही १ मे २०२५ रोजी २५ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावी. म्हणजे उमेदवाराचा जन्म २ मे १९९२ ते १ मे २००० या कालावधीत झाला असावा. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू आहे. निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा (गरज भासल्यास), स्क्रीनिंग, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांतून होणार आहे. त्यामुळे अर्ज करताना उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची तयारी ठेवावी.