फोटो सौजन्य - Social Media
NTPC आणि SAIL यांच्या संयुक्त उपक्रमातून स्थापन झालेल्या NTPC SAIL Power Company Limited (NSPCL) या कंपनीने सहाय्यक अधिकारी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे (Advt. No. 01/2025). ही भरती पर्यावरण व्यवस्थापन (Environment Management) आणि सुरक्षा (Safety) या दोन महत्त्वाच्या विभागांमध्ये केली जात आहे. या भरतीद्वारे उमेदवारांना भारतातील एक अग्रगण्य पॉवर जनरेशन कंपनीसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ही पदं E0 ग्रेडमधील आहेत. इच्छुक उमेदवार 21 एप्रिल 2025 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2025 रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड अखिल भारतीय ऑनलाइन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षेत दोन चाचण्या घेतल्या जातील – विषय ज्ञान चाचणी (Subject Knowledge Test – SKT) आणि कार्यकारी क्षमता चाचणी (Executive Aptitude Test – EAT). दोन्ही परीक्षांमध्ये पात्र ठरणे अनिवार्य आहे. अंतिम निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षेला 85% आणि मुलाखतीला 15% गुण देण्यात येतील.
या भरतीअंतर्गत दोन प्रकारची पदं जाहीर करण्यात आली आहेत. सहाय्यक अधिकारी (पर्यावरण व्यवस्थापन) पदासाठी एकूण 3 जागा आहेत. यासाठी उमेदवारांकडे पर्यावरण अभियांत्रिकी पदवी किंवा संबंधित क्षेत्रात M.Sc./M.Tech/डिप्लोमा असणे आवश्यक आहे आणि किमान 60% गुण असावेत. या पदासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.
तर सहाय्यक अधिकारी (सुरक्षा) पदासाठी एकूण 2 जागा आहेत. यासाठी उमेदवारांकडे पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी आणि CLI किंवा RLI मान्यताप्राप्त संस्थेतून औद्योगिक सुरक्षा विषयक डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे. आरक्षणानुसार SC/ST/OBC-NCL/PwBD/XSM उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.
अर्ज करताना, सामान्य/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹300 शुल्क आकारले जाईल. SC/ST/PwBD/XSM आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी NSPCL च्या www.nspcl.co.in या वेबसाईटवर जाऊन ‘Careers’ विभागातून ऑनलाइन फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि अर्ज सादर करावा.